28 September 2020

News Flash

अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईला वेग

मुंबई महापालिकेकडून वीज-पाणीपुरवठा खंडित; पाडकामास प्राधान्य

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महापालिकेकडून वीज-पाणीपुरवठा खंडित; पाडकामास प्राधान्य

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेऊन कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही इमारतींचा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्यात येत असून रिकाम्या के लेल्या इमारतींचे युद्धपातळीवर पाडकाम करण्यात येत आहे.

पावसाळ्यापूर्वी घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये मुंबईत ४४३ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये महापालिकेच्या ५२, सरकारच्या २७ आणि खासगी ३६४ इमारतींचा समावेश आहे. पालिकेच्या ‘परिमंडळ-३’ म्हणजेच वांद्रे पूर्व-पश्चिम, अंधेरी-पूर्व आणि परिसरात सर्वाधिक म्हणजे १०९ अतिधोकादायक इमारती आहेत. त्याखालोखाल ‘परिमंडळ-६’ म्हणजे घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरांतील १०५ इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहेत.

पश्चिम उपनगरातील पालिकेच्या काही विभाग कार्यालयांनी अतिधोकादायक इमारतींबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘परिमंडळ-७’मधील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरांतील ५३ पैकी आठ धोकादायक इमारती जमीनदोस्त, तर १४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतरही १६ इमारतींमध्ये रहिवाशी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. २० इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १८ इमारतींबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ इमारतींबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले आहे. २५ अतिधोकादायक इमारतींची प्रकरणे प्रलंबित असून या इमारतींबाबत संबंधित विभाग कार्यालये कारवाईच्या पवित्र्यात आहेत.

पालिकेच्या के-पश्चिम विभागाने एस. व्ही. रोड येथील धोकादायक इमारतीचा वीज, पाणीपुरवठा खंडित केला होता. रहिवाशांनी इमारत रिकामी केल्यानंतर या इमारतीचे पाडकाम सुरू झाले आहे. आंबोली येथील एका इमारतीचा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून या इमारतीचे पाडकामही हाती घेण्यात येणार आहे.

अतिधोकादायक इमारत वेळीच रिकामी करून रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ‘के-पश्चिम’ विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केले आहे. या विभागात ४४ अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी १३ इमारती रिकाम्या, तर १५ इमारतींचा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठाण्यात बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम

’ करोना प्रादुर्भावाच्या काळात ठाणे शहरात बेकायदा बांधकामे उभी राहिल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. येत्या ४ सप्टेंबरपासून या सर्व बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सहायक आयुक्तांना शुक्रवारी दिले.

’ करोना आटोक्यात आणण्याच्या कामात पालिका अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. त्याचाच फायदा घेऊन भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली आहेत. प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून सोमवापर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्वच सहायक आयुक्तांना दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 2:09 am

Web Title: bmc start action on high risk buildings zws 70
Next Stories
1 शहरांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती
2 मुंबईतील पाणीकपात पूर्णत: रद्द
3 मोहरमच्या मिरवणुकीला सशर्त परवानगी
Just Now!
X