नोंदणी करण्यासाठी पालिकेची धडपड; आतापर्यंत केवळ २३७ जणांचीच नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त आयोजित केलेल्या स्वच्छतेच्या स्पर्धेत अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी शहरातील कचरा वेचकांची नोंदणी करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कायम उपेक्षित राहिलेल्या कचरावेचकांची मुंबई महापालिकेला आठवण झाली असून पालिकेने कचरावेचकांचा शोध सुरू केला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने कचरावेचकांना ‘स्वच्छाग्रही’ अशी उपाधी देण्यात आली असून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेच्या वर्गीकरण केंद्रांमध्ये जागा देण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे. मात्र आतापर्यंत केवळ २३७ कचरावेचकांची नोंदणी करण्यात पालिकेला यश आले आहे.

मुंबईतील उकीरडय़ावर तासन्तास थांबून, रस्ता-पदपथावर वणवण करून, तसेच पायपीट करीत घरोघरी फिरून कचरा गोळा करण्याचे काम कचरावेचक करीत आहेत. या कचरावेचकांमुळे काही प्रमाणात पालिकेवरील कचऱ्याचा भार हलका होतो. कचरा वेचून त्यातील काही वस्तूंची भंगारवाल्याकडे विक्री करून कचरावेचक महिला आणि पुरुष आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मात्र कुणीच लक्ष देत नाही. असे असताना ‘स्वच्छ शहर’ परीक्षेच्या निमित्ताने पालिकेला कचरावेचकांची आठवण झाली आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये विविध शहरांसाठी स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये कचरावेचकांना विशेष स्थान देण्यात आले आहे. कचरा वेचून एक प्रकारे स्वच्छतेचे काम करणाऱ्या कचरावेचकांची स्थानिक स्वराज्य संस्थांना नोंदणी करण्याचे, त्यांना ओळखपत्र देण्याचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे बंधन या स्पर्धेमध्ये घालण्यात आले आहे. शहरातील १०० टक्के कचरा वेचकांची नोंदणी केल्यानंतर ३२ गुण, ८० ते ९९ टक्के कचरा वेचकांची नोंदणी केल्यानंतर २६ गुण, ६० ते ७९ टक्के नोंदणीनंतर २० गुण, ४० ते ५९ टक्के नोंदणी झाल्यास १४ गुण, २० ते ३९ टक्के नोंदणीसाठी आठ गुण, १ ते १९ टक्के नोंदणीसाठी २ गुण देण्यात येणार आहेत. कचरा वेचकांची मोठय़ा संख्येने नोंदणी करून अधिकाधिक गुण मिळविण्याचा प्रयत्न सध्या पालिका करीत आहेत.

मुंबईमध्ये दारोदारी फिरून, रस्ता-पदपथावर वणवण करून आणि तासन्तास उकीरडय़ावर थांबून कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचकांची संख्या प्रचंड आहे. बहुतांश कचरा वेचक असंघटित आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी आकडेवारी पालिकेकडे नाही. त्यासाठी मुंबईत सर्वेक्षण करण्याची गरज आहे.  मुंबईमधील कचराभूमीवर कचरा गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कचरावेचकांचे स्त्रीमुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघ, आकार फोर्स आणि अपनालय या चार संस्था प्रतिनिधित्व करीत होत्या. साधारण चार ते पाच हजार कचरावेचक या संस्थांचे सभासद आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कचराभूमींचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आल्याने या कचरावेचकाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला.

आता पालिकेने या संस्थांशी संपर्क साधून कचरावेचकांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. या कचरावेचकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच कचरावेचकांनी गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मुंबईमधील पालिकेच्या ३७ कचरा वर्गीकरण केंद्रांमध्ये जागा देण्यात येणार आहे.

केंद्रावर उपलब्ध असलेल्या भंगारवाल्याकडे त्यांना त्याचा कचरा विकण्याची मुभाही मिळणार आहे. त्यासाठी आता पालिकेने कचरावेचकांचा शोध सुरू केला आहे. कचरा वेचकांसाठी ही योजना चांगली असली तरी ती कितपत यशस्वी होते त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

घरोघरी फिरून कचरावेचक रस्ता, पदपथावरच कचऱ्याचे वर्गीकरण करीत असतात. मात्र आता कचरावेचकांची नोंदणी करून त्यांना पालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रांमध्ये जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे कचरावेचकांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय