तरुण, मध्यमवयीन, अल्पवयीन महिला आणि मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागल्या असून या महिला विकृत आणि वासनांध पुरुषांच्या लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ‘त्या’ दुर्दैवी घटनेनंतर शारीरिक आणि मानसिक धक्क्यातून सावरण्याबरोबरच वैद्यकीय तपासणी, पोलीस चौकशी, पोलिसांत तक्रार दाखल करणे अशा दिव्याला त्या महिलेला सामोरे जावे लागते. हे दिव्य तिला मनस्ताप वाटू नये आणि ‘त्या’ महिलेला मानसिक आधार व लढण्याचे बळ मिळावे, यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये वेगळा कक्ष सुरू करण्यात आला आहे.
नको तो मनस्ताप आणि बदनामी म्हणून बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये संबंधित महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत किंवा एखादी महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे आली तरी तिला नेमके काय करायचे ते कळत नाही. योग्य मार्गदर्शन आणि संबंधित महिलेची वेळीच वैद्यकीय तपासणी न झाल्यामुळे पुरावाही नष्ट होण्याची शक्यता असते. तसेच ‘त्या’ धक्क्यातून सावरण्यासाठी, जगण्याचे आणि लढण्याचे बळ देण्यासाठी खंबीर आधाराची गरज असते. पोलिसी खाक्याने चौकशी न करता तिच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालून तिला समजून घेणे गरजेचे असते आणि तेच काम आम्ही येथे करणार आहोत, अशी माहिती या तीन रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
बलात्कार झालेली महिला या रुग्णालयाच्या विभागात आल्यानंतर तिची तातडीने वैद्यकीय तपासणी केली जाईल. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ असे तिघेही एकाच वेळी तिथे असतील. येथे त्या महिलेची वैद्यकीय तपासणी, घटनेचे पुरावे गोळा करणे हे काम केले जाईलच परंतु मुख्यत: तिला मानसिक आधार दिला जाईल. तिच्या मनावर झालेला आघात समजून घेऊन घटनाक्रमाची माहिती घेण्यात येईल. या धक्क्यातून तिला सावरणे, पुढील आयुष्य नव्याने जगण्यासाठी तिला बळ देणे आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करणे, पोलिसांना कळविणे आदी महत्त्वाचा भागही येथून केला जाईल. महापालिकेच्या या तीन रुग्णालयांमध्ये हे काम या अगोदरही केले जात होतेच, मात्र महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे याला अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्यात आले आहे.