पालिकेने धोकादायक ठरवलेल्या वडाळा येथील सिद्धार्थ वसतिगृह पाडण्याच्या कारवाईस सोमवारी सुरुवात झाली. दलित चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी इमारत पाडण्यास विरोध केला. मात्र त्यांना बाहेर बोलावून पालिकेच्या पथकाने शंभरहून अधिक दरवाजे काढले. यानंतर टप्प्याटप्प्यात इमारत जमीनदोस्त करण्यात येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडून ही इमारत १९६० मध्ये बांधण्यात आली. तेव्हापासून या इमारतीची एकदाची दुरुस्ती करण्यात आली नाही. पालिकेने पोलिसांच्या मदतीने वसतिगृह पाडण्याच्या कारवाईला सोमवारी सकाळी सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला विरोध केला. मात्र चचेऱ्च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बाहेर काढून पालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. पालिकेने इमारत धोकादायक असल्याच्या नोटीस वारंवार पाठवल्या होत्या. मात्र या कारवाईबाबत पालिकेने कोणतीही माहिती आधी दिली नसल्याचे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ कांबळे यांनी सांगितले.

ही इमारत धोकादायक असल्याच्या नोटीस पालिकेकडून १९८७ पासून पाठवण्यात आल्या. उच्च न्यायालयानेही ही इमारत धोकादायक असल्याने तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील विश्वस्तांच्या वादात  इमारतीची दुरुस्ती होऊ शकली नाही, असा आरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला.