पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरवृद्धीसाठी पालिकेकडून विविध उपक्रम

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा मूलभूत अध्ययन स्तर वृद्धिंगत करण्याचा संकल्प सोडला असून भाषा आणि गणितामध्ये कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेऊन त्यांचा या दोन्ही विषयांतील अध्ययन स्तर उंचावण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याअखेरीस विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित विषयाच्या अध्ययन स्तरात अनुक्रमे २९.४८ टक्के व २५.९३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले आहे. या शैक्षणिक वर्षांत या दोन्ही विषयांमध्ये अध्ययन स्तरनिश्चितीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आले नसले, तरी पुढील शैक्षणिक वर्षांत निरनिराळे उपक्रम हाती घेऊन उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले मोठय़ा संख्येने शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र घरी अभ्यासासाठी नसलेले पोषक वातावरण, घरची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे मुलांना करावे लागणारे काम, त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची लागणारी कमी उपस्थिती अशा विविध कारणांमुळे पालिका शाळांमधील विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील गळती रोखण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या दृष्टीने पालिकेने विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना सुरू केली. मात्र तरीही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आणि गळतीचा प्रश्न सुटू शकलेला नाही. पालिका शाळेतील एकूणच परिस्थितीबाबत नाके मुरडली जातात. एक दुय्यम शाळा म्हणूनच पालिका शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बनला आहे. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी पालिकेने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर जाणून घेण्यासाठी प्रयोग सुरू केले आहेत.

शिक्षण विभागाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित विषयांच्या चाचण्या घेतल्या. त्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये भाषेचा स्तर ३८.५२ टक्के, तर गणिताचा स्तर ४९.१७ टक्के असल्याचे आढळून आले. या दोन्ही विषयांत कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्याची सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना करण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही विषयांकडे कमी कल असलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली. हळूहळू या विद्यार्थ्यांना या दोन्ही विषयांमध्ये गोडी लागत असल्याचे दिसून आले.

त्यानंतर केलेल्या पाहणीमध्ये विद्यार्थ्यांचा भाषेचा स्तर ५२.१८ टक्के, तर गणिताचा स्तर ७३.२८ टक्क्यांवर पोहोचल्याचे निदर्शनास आले. शिक्षण विभागाने मार्च २०१८ अखेरीस केलेल्या पाहणीमध्ये विद्यार्थ्यांचा भाषा विषयातील अध्ययन स्तर ६८ टक्क्यांवर, तर गणितामधील अध्ययन स्तर ७५.१ टक्क्यांवर पोहोचल्याचे निदर्शनास आले.

१०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचा मानस

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. मात्र नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा भाषा आणि गणित विषयाच्या अध्यायन स्तरनिश्चितीचा उपक्रम हाती घेण्यात येणार असून सप्टेंबर २०१८ पर्यंत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा या दोन्ही विषयांतील अध्ययन स्तरनिश्चितीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचा पालिकेचा मानस आहे.

समाजाचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी पालिका विद्यार्थ्यांचा अध्यायन स्तर उंचावण्याची गरज आहे. त्यासाठी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून त्याचे परिणाम दिसू लागतील.

– महेश पालकर, शिक्षणाधिकारी