उद्या रात्रीपर्यंत मुंबईतील लसीकरण केंद्रांमध्ये कुप्या पोहोचणार

मुंबई : करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या पहिल्या टप्प्यातील एक लाख ३९ हजार कुप्या मुंबईच्या वाटय़ाला आल्या असून हा साठा बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शहरात दाखल झाला. लसीकरणासाठी मुंबईभर निश्चित करण्यात आलेल्या नऊ केंद्रांवर वितरण करण्याबाबत नियोजन सुरू असून शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळपर्यंत लशींचा साठा प्रत्येक केंद्रावर पोहोचण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटमधून लशीच्या १ लाख ३९ हजार ५०० कुप्यांचा साठा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईत आणला. सुरक्षिततेसाठी पोलिसांची दोन वाहने सोबत होती. सध्या हा साठा पालिकेच्या परळ येथील आरोग्य खात्याच्या मुख्य कार्यालयातील तळमजल्यावरील लस भांडारात ठेवण्यात आला आहे. लशीची २ ते ८ अंश सें. तापमानाखाली साठवणूक करण्यासाठी येथे दहा मोठय़ा शीतपेटय़ा असून यातील प्रत्येक शीतपेटीत ३० हजारांहून अधिक कुप्यांची साठवणूक करण्याची क्षमता आहे.

नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनुसार प्रत्येक केंद्रावर किती व्यक्तींना लस दिली जावी याचे नियोजन सुरू आहे. लसीकरणासाठी पाठविण्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती लसीकरण के ंद्राना आदल्या दिवशी दिली जाईल. तसेच त्या व्यक्तींनाही कोणत्या केंद्रावर लस घेण्यासाठी जायचे आहे हा संदेश आदल्या दिवशी पाठविला जाईल. आता वितरण आणि केंद्रावर लसीकरणाच्या सत्रांचे नियोजन ही प्रक्रिया सुरू असल्याचे लसीकरण विभागाच्या डॉ. शीला जगताप यांनी सांगितले.

लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या नऊ केंद्रांवर लशींचा साठा पुरविण्यासाठी चार मार्ग आखून त्याचा आराखडा तयार केलेला आहे. यासाठी ३०० छोटय़ा शीतपेटय़ा आणि चार गाडय़ा सज्ज आहेत. कोणत्या केंद्रांना किती लशींचा पुरवठा करायचा याचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यानुसार आधीच पुरवठा न करता शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी त्या नेण्याचा विचार सध्या सुरू आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

५० हजार सीरिंज उपलब्ध

लसीकरणासाठी आवश्यक सीिरजची मागणी केंद्राकडे केली असून अद्याप साठा आलेला नाही. परंतु पालिकेने पूर्वतयारीअंतर्गत ५० हजार  सीिरज खरेदी के लेली आहेत.  केंद्रीय स्तरावरून शनिवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले जाणार असून मुंबईत कूपर रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नोंदणी अजूनही सुरू

लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी अजूनही सुरू आहे. तसेच प्रत्येक विभागामध्येही संबंधित आरोग्य संस्थेसोबत बैठक घेऊन ही माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत शहरात खासगी आणि पालिके च्या १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी के लेली आहे.

कांजूर येथील लस भांडार सज्ज

कांजूर येथील लस भांडारामध्ये ९० लाख  कुप्यांच्या साठवणुकीची क्षमता आहे. यासाठी आवश्यक मोठय़ा शीतपेटय़ा इत्यादी सामुग्री सध्या तेथे उपलब्ध आहे. या सुविधा आठ तासांत सुरू करून लशीची साठवणूक करता येऊ शकते. दहा लाखांपेक्षा कमी कुप्या आल्यास परळ येथील कार्यालयात साठविण्याचा निर्णय आधीच घेतला होता. कारण १० लाख कुप्यांच्या साठवणुकीसाठी इतकी मोठी यंत्रणा कार्यरत करणे अनावश्यक खर्चीक आहे. १० लाखांपेक्षा अधिक साठा आल्यानंतर या भांडारात पाठविला जाईल. केंद्राची इतर कामे आठ दिवसांत पूर्ण होतील. परंतु यामुळे लशीच्या साठवणुकीसाठी अडचण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.