‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या पालिकेच्या बहुचर्चित आव्हानातील विजेत्या तक्रारदारांना अखेर पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. मोहीम संपली तरी बक्षीस देण्याचे नाव घेत नसल्यामुळे पालिकेवर टीका होऊ लागली होती. तक्रारदारांच्या व प्रसारमाध्यमांच्या वाढत्या दबावामुळे अखेर पालिकेने बक्षिसाचे पाचशे रुपये देण्यास सुरुवात केली आहे. जे खड्डे २४ तासांत बुजवले गेले नाहीत त्यांच्या तक्रारदारांना फोन करून बोलावून घेतले जात असून त्यांना रोख पाचशे रुपये देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ही योजना आणली होती. २४ तासांत खड्डे बुजवले नाही तर पाचशे रुपये अधिकाऱ्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशातून देण्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना जबाबदारीची जाणीव व्हावी याकरिता ही योजना आणण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले होते. त्यामुळे मोहिमेत खड्डे वेगाने बुजवले गेले. मात्र काही ठिकाणी २४ तासांची मुदत उलटून गेली होती. त्यामुळे २४ तासांत जिथे खड्डा भरला नाही अशा तक्रारदारांना ५०० रुपये बक्षीस कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या आठवडय़ापासून प्रशासनाने हे बक्षिसाचे पैसे देण्यास सुरुवात केली असून सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी ९२ टक्के तक्रारी या मुदतीत सोडवल्या असून केवळ ८ टक्के तक्रारीत हे पैसे द्यावे लागणार असून हा आकडा शंभरपेक्षा अधिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पॉटहोल वॉरियर या संस्थेचे मुश्ताक अन्सारी यांनाही माहीम येथील एका खड्डय़ाच्या तक्रारीसाठी पाचशे रुपये बक्षीस मिळाले असल्याची माहिती अन्सारी यांनी दिली. बक्षिसाची रक्कम मिळावी याकरिता अन्सारी यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालिकेकडून त्यांना दूरध्वनी करून बुधवारी बोलावून घेण्यात आले व त्यांना पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बक्षिसाची रक्कम रोख दिली जात असून तक्रारदारांनी आपली ओळख सिद्ध केल्यानंतर त्यांना हे बक्षीस दिले जात आहे.

प्रत्यक्षात ही मोहीम केवळ सात दिवसांसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र या योजनेला लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता आणि त्यामुळे वेगाने होणारे काम पाहता ही मोहीम पुढे सुरूच राहणार आहे. मुंबईच्या रस्त्यावरील खड्डय़ांच्या तक्रारी शून्यावर येईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.
विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त