इंटरनेटच्या माध्यमातून १२५ ठिकाणांचा शोध

कमला मिल कम्पाऊंडमधील ‘मोजोस बिस्ट्रो’मध्ये हुक्क्यातून उडालेल्या ठिणगीतून आग लागल्याचे उघड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने शहरातील हुक्का पार्लरवर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु यातील मेख अशी की, सामान्य मुंबईकरांनाही माहीत असलेल्या हुक्का पार्लरची पालिकेच्या अधिकाऱ्यांना अजिबात कल्पना नाही. त्यामुळेच कारवाईची हुक्की येताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी इंटरनेटवरील ‘सर्च इंजिन’ आणि समाजमाध्यमांवरून मुंबईतील हुक्का पार्लरचा शोध सुरू केला. शहरातील सर्वात लोकप्रिय, उपनगरातील प्रसिद्ध अशा शिफारशी असलेल्या संदेशावरून आणि रेस्ट्रोबार, लाऊंजमधील हुक्काच्या फोटोंवरून तब्बल १२५ हुक्का पार्लरची यादी तयार करण्यात आली असून त्यावर कारवाई केली जाईल.

तंबाखू, गुटखा, दारू, सिगारेट, ड्रग्ज याबाबत कायद्यात उल्लेख असला तरी हुक्का पार्लर कोणत्याही नियमात बसत नसल्याने ते चालवणे बेकायदा ठरते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर असले किंवा प्रसिद्ध रेस्ट्रोबार आणि लाऊंजमध्ये हुक्का सर्रास दिला जात असला तरी त्याबाबत पालिकेकडे नोंद नाही. ‘स्मोकिंग झोन’चा परवाना घेऊन तिथे हुक्का पार्लर चालवली जातात, असाही अनुभव आहे. आतापर्यंत महापालिकेकडून हुक्का पार्लरबाबत सौम्य भूमिका घेतली जात होती. मात्र कमला मिल दुर्घटनेत मोजोस बिस्ट्रो या उपाहारगृहाच्या गच्चीवर हुक्क्यामधील पेटत्या कोळशातून उडालेल्या ठिणगीने आग लागल्याचे समोर आले. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी हुक्का पार्लरविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे.

कारवाई करायची असली तरी कशी आणि कोणावर याबाबत पालिका अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. वॉर्डमधील हुक्का पार्लरची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना असली तरी त्याची एकत्रित माहिती उपलब्ध नव्हती. यावर उपाय शोधून काढत पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑनलाइनचा आधार घेतला. सामाजिक माध्यमावरून या हुक्का  पार्लरची त्यांच्या छायाचित्रांसह भलामण केली जाते. असे संदेश तसेच सर्च इंजिनवरील हुक्का पार्लरचे संपर्क यांची माहिती एका रात्रीत गोळा करत या अधिकाऱ्याने तब्बल १२५ हुक्का केंद्रांची यादी तयार केली आहे. हुक्का पार्लरबाबत समाजाच्या विशिष्ट  गटांमध्ये तसेच तरुणांमध्ये क्रेझ असते आणि त्याबाबत सामाजिक माध्यमांवर खुलेआम चर्चा सुरू असतात, तसेच खुद्द या हुक्का पार्लर्सची नोंद ऑनलाइन डिरेक्टरीमध्ये असते. त्याचाच आधार घेत ही माहिती शोधून काढल्याचे पालिकेतील अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कायद्यातच उल्लेख नसल्याने हुक्का पार्लरवर थेट कारवाई करता येणे मात्र शक्य नाही. पालिका प्रशासनाने यावरही उपाय शोधला आहे.

हुक्का पार्लरचा फलक लावला आहे का किंवा उपाहारगृहाचा फलक लावून आतमध्ये हुक्का दिला जात आहे का, आरोग्य खात्याची परवानगी घेतली आहे का, अग्निसुरक्षेची काळजी घेतली आहे का, अनधिकृत बांधकाम आहे का, हुक्का पार्लर असलेले ठिकाण इमारत बांधकाम विभागाच्या मंजुरीनुसार आहे का, या बाबी विचारात घेतल्या जातील, अशी माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली. यासाठी पालिकेच्या आरोग्य, इमारत प्रस्ताव, अग्निशमन दल, अतिक्रमण, परवाना अशा विविध विभागांकडून तसेच पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.