क्षयरोगाविरोधात जनजागृतीसाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेचे उद्घाटन रविवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अमिताभ बच्चनने संदेश दिलेल्या ‘टीबी हारेगा, देश जितेगा’ या माहितीपटाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
लोकसंख्येची घनता, अस्वच्छता आणि जागृतीचा अभाव यामुळे शहरात क्षयरोगाने उग्र स्वरूप धारण केले असून त्याविरोधात पालिकेने बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी माहितीपटातून संदेश देण्याची योजना आखण्यात आली. अमिताभ यांनी माहितीपटातून विनामोबदला काम करण्यासाठी लगेच तयारी दर्शवली. रविवारी जुहूच्या जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.
मुंबईत दरवर्षी क्षयरोगाचे सुमारे ३० हजार रुग्ण आढळतात. क्षयरोगाच्या काही औषधांना दाद न देणाऱ्या (एमडीआर) क्षयरोग रुग्णांची संख्या नोव्हेंबर २०१४ पर्यंत ८७७२ तर कोणत्याही औषधांना बिलकुल दाद न देणाऱ्या (एक्सएक्सडीआर) रुग्णांची संख्या ३१५३ वर पोहोचली आहे.
आरोग्याबाबतची उदासीनता व क्षयरोगाबाबतची मानसिकता यामुळे आजाराचे निदान व उपचार यात ३० ते ३५ दिवसांचा अवधी जातो. या काळात क्षयरोग बळावण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पालिकेने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त कुर्ला येथील पालिका कार्यालयात सफाई कामगारांसाठी आयोजित आरोग्य शिबीरात क्षयरोगाचे २० रुग्ण सापडले, अशी माहिती अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी दिली. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. यात ४०० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. पंचशील महिला मंडळ, अथक सेवा संघ आणि महात्मा गांधी केंद्र यांनी संयुक्तपणे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.  डॉ. संजय फुंदे, डॉ. किरण केणी, डॉ. घाटणेकर व डॉ. स्मिता नाटे यांनी रुग्णांची तपासणी केली.