माटुंगा, चेंबूर, दहिसरमधील झोपडपट्टय़ा, वसाहतींवर लक्ष केंद्रित

मुंबई : मुंबई महापालिकेने माटुंगा, चेंबूर आणि दहिसर परिसरांत दुसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणाला १३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या भागातील झोपडपट्टय़ा आणि वसाहतींमध्ये १३ ते २८ ऑगस्ट या काळात सेरो सर्वेक्षण करण्यात येईल.

आयसीएमआरच्या सूचनेनुसार मुंबईमधील एफ-उत्तर (माटुंगा), एम-पश्चिम (चेंबूर) आणि आर-उत्तर (दहिसर) विभाग कार्यालयांच्या हद्दीत दुसऱ्या टप्प्यात सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही भागांतील झोपडपट्टय़ांमध्ये १३ ते २० ऑगस्टदरम्यान, तर वसाहतींमध्ये १७ ते २८ ऑगस्टदरम्यान सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान दहिसरमधील इमारतींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचा अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा यादृष्टीने आखणी करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे साधारण एका आठवडय़ात अहवाल मिळू शकेल. तसेच सर्वेक्षणात माहिती आणि तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांच्या नोंदी दोन स्वतंत्र अ‍ॅपमध्ये करण्यात येणार आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

६३०३ रुग्णांची नोंद

शहरात सध्या बोरिवलीमध्ये दरदिवशी सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या विभागात आत्तापर्यंत ६३०३ रुग्णांची नोंद असून २२१ मृत्यू झाले आहेत. सध्या ११८३ बाधित रुग्ण आहेत.