News Flash

अडेल सोसायटय़ांचे नाक दाबले!

खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या आदेशांना हरताळ फासणाऱ्यांविरोधात पालिकेने आता कडक कारवाई आरंभली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

आवारात खतनिर्मिती न करणाऱ्या गृहसंस्थांचा कचरा उचलणे बंद; दक्षिण, मध्य मुंबईसह उपनगरांतही पालिकेची कारवाई

दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, उपाहारगृहे, औद्योगिक वसाहतींनी आवारातच खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या आदेशांना हरताळ फासणाऱ्यांविरोधात पालिकेने आता कडक कारवाई आरंभली आहे. खतनिर्मितीबाबत नकारघंटा वाजविणाऱ्या दक्षिण मुंबईसह दादर, माटुंगा, शीव, वडाळा, चुनाभट्टी, वांद्रे, अंधेरी आदी विविध भागांतील काही सोसायटय़ांमधील कचरा उचलणे पालिकेने बंद केल्याने या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने ही कारवाई सुरू करताच या सोसायटय़ांचे पदाधिकारी आता मुदतवाढीसाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांत धाव घेऊ लागले आहेत.

मुंबईतील २० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच दर दिवशी १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांना कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. २ ऑक्टोबरपासून अशा ठिकाणचा कचरा न उचलण्याचा निर्णयही घेण्यात आला; परंतु अनेक सोसायटय़ांनी खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने त्यांना तीन महिने दिलासा देण्यात आला. त्याच वेळी पालिकेच्या पुढाकारानंतरही खतनिर्मिती यंत्रणा उभारण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा उचलणे पालिकेने बंद केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोसायटीच्या आवारात कचरा पडून राहू लागताच पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयात धाव घेऊन खतनिर्मिती यंत्रणा बसविण्याची कबुली देण्यास सुरुवात केली आहे. कुलाबा ते मरिन ड्राइव्ह, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरात तब्बल ४२१ हॉटेले आहेत. यापैकी १०९ हॉटेलांमध्ये  दर दिवशी १०० किलोहून अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट हॉटेलच्या पातळीवरच लावली जावी यासाठी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मात्र कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास या हॉटेलांकडून प्रतिसादच देण्यात आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2017 4:16 am

Web Title: bmc stop collecting garbage of housing societies for not converting wet waste into compost
टॅग : Garbage
Next Stories
1 ‘अ‍ॅप’आधारित तिकीट सेवा विस्तारण्याचा रेल्वेचा निर्णय
2 ग्राहक प्रबोधन : रास्त विलंब ग्रा!
3 मुंबई बडी बांका : मुंबईतील जाग्याचा संकोच!
Just Now!
X