आणखी ३ महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता

सहामाही परीक्षा तोंडावर आलेली असूनही महापालिका शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांच्या टॅबचे कंत्राटच अजून देण्यात आले नसल्याने शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी योजनेने तिसऱ्या वर्षीच गटांगळी खाल्ल्याचे दिसत आहे. नववीचा अभ्यासक्रम उशिरा आल्याचे निमित्त महापालिकेचे अधिकारी पुढे करत असले तरी मुळात तीन वर्षांसाठी कंत्राट दिले असताना तिसऱ्या वर्षी नव्याने कंत्राट का काढले जात आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उमटले आहे.

महापालिका शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यासाठी ऑगस्ट २०१५ मध्ये स्थायी समितीमध्ये ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला टॅबचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र पहिल्याच वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटण्यासाठी डिसेंबर उजाडला होता. २०१४च्या अ‍ॅण्ड्रॉइड प्रणालीवर असलेल्या या टॅबची बॅटरी लवकर घसरत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना या टॅबचा नीट उपयोगही करता येत नव्हता. गेल्या वर्षी आठवीतून नववीत जाणाऱ्या मुलांना त्यांच्याच जुन्या टॅबमध्ये नवा अभ्यासक्रम घालून देण्यात आला. मात्र आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे नवे टॅब मात्र विलंबाने आले. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’ने (बीआयएस) बॅटरीसाठी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय टॅब वितरित करता येत नसल्याने गेल्या वर्षीही आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती टॅब उशिरा पडले. या वर्षी नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती अद्यापही टॅब आलेले नाहीत.

सुमारे १३ हजार टॅबसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश देणे व प्रत्यक्षात टॅबमध्ये नववीचा अभ्यासक्रम अपलोड करून तो विद्यार्थ्यांना देण्यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिसेपर्यंत डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. तीन वर्षांचे कंत्राट दिले असताना तिसऱ्या वर्षी नव्याने कंत्राट काढायची गरज का पडली, असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. यासंदर्भात वारंवार संपर्क साधूनही शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कंत्राटच नाही

याबाबत पृथ्वीराज म्हस्के यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांवर पालिकेने टॅबचे कंत्राटच दिले नसल्याचे स्पष्ट झाले. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून टॅबची खरेदी करण्यात आलेली नाही. आठवीच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीचे टॅब देण्यात आले असून नववीच्या अभ्यासक्रमात बदल झाला असल्याने विद्यार्थ्यांना जूनमध्ये टॅब देता आले नाहीत, असे उत्तर महानगरपालिकेच्या जनमाहिती अधिकाऱ्याने दिले आहे.