देश-विदेशी पर्यटकांचा कायम राबता असलेल्या, तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील लक्ष्य बनलेल्या कुलाबा कॉजवे येथील लिओपोल्ड कॅफेच्या वाढीव अनधिकृत बांधकांमांवर मुंबई महापालिकेने बुधवारी कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपासून ‘लिओपोल्ड कॅफे’च्या दर्शनी भागात पदपथावर उभारण्यात आलेल्या छपरावर पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या छपरावर पक्के बांधकाम करून कॅफेला लागणारे साहित्य ठेवण्यासाठी खोली उभारण्यात येत आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी करुन पालिकेने ‘लिओपोल्ड कॅफे’च्या मालकांवर नोटीस बजावली होती. पदपथावरील छपरावर करण्यात येत असलेले बांधकाम तात्काळ बंद करावे आणि २४ तासांमध्ये ते हटवावे, असे आदेश पालिकेने दिले होते. परंतू पालिकेच्या नोटीसला कॅफेने कोणतेही उत्तर न दिल्यामळे मुंबई महापालिकेने बुधवारी ही कारवाई केली आहे.

कमला मिल अग्नितांडवानंतर पालिकेने हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामे आणि अनियमितता यावर करडी नजर ठेवली आहे. पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुलाबा कॉजवे परिसरातील २७ एन. एफ. रोडवरील रुस्तम मंजिलच्या तळमजल्यावर ‘लिओपोल्ड कॅफे’ असून या कॅफेमध्ये कायम विदेशी पर्यटकांचा राबता असतो. मद्यप्रेमी देश-विदेशी पर्यटकांसाठी ‘लिओपोल्ड कॅफे’ आकर्षण बनले आहे. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ‘लिओपोल्ड कॅफे’ लक्ष्य करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या कॅफेतील पर्यटकांचा राबता कमी झालेला नाही.