कुर्ला उपाहारगृह दुर्घटना; शहरातील हजारो बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष
कुर्ला येथील उपाहारगृहातील सिलेंडर स्फोटाने आठ जणांचा बळी घेतल्यावर जाग आलेल्या पालिकेने कुर्ला येथील खाद्यविक्रीची नऊ दुकाने सीलबंद केली, तर उर्वरित मुंबईतील साधारण ३० उपाहारगृहांवर कारवाई केली. शहरभरातील हजारो उपाहारगृहांमध्ये अनधिकृत बांधकाम व वापर सुरू असल्याचे सामान्य मुंबईकर अनुभवत असताना पालिकेची पहिल्या दिवसाची ही कारवाई अगदीच तुटपुंजी ठरली आहे.
कोणतेही खाद्यपदार्थाचे उपाहारगृह सुरू करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रमाणपत्रांची तसेच ना-हरकत प्रमाणपत्रांची गरज असते. त्यात अग्निसुरक्षेपासून बांधकाम विभागाच्या परवानगीपासून आरोग्य विभागाच्या प्रमाणपत्रांपर्यंत १४ परवानग्या आवश्यक असतात. शहरातील अनेक उपाहारगृहांकडे ही सर्व प्रमाणपत्रे नसतात तसेच नियम डावलून कामे सुरू ठेवली जातात.
मात्र त्याकडे पालिका सोयीस्कर दुर्लक्ष करते. शुक्रवारी कुर्ला येथील सिटी किनारा या उपाहारगृहातील दुर्घटनेनंतर मात्र महानगरपालिकेने सोमवारी कुर्ला येथील उपाहारगृहांची पाहणी सुरू केली. दिवसभरात पालिकेने पाहणी केलेल्या १२ उपाहारगृहांपैकी नऊ उपाहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. कारवाई केलेल्यांमध्ये किनारालगतचे हॉटेल दर्शन, मंजुनाथ फास्ट फूड, सीताराम चहाचे दुकान, रामेश्वर वडापाव, सवना फिनिक्स, आशिया बार, ऑरोमास कॅफे, मोतीमहाल, पंचवटी गौरव यांचा समावेश आहे.
या नऊ उपाहारगृहांपैकी काहींमध्ये आरोग्य विभागाकडून परवाना मिळवला गेला नव्हता तसेच अनधिकृत उपमाळा काढण्यात आला होता. अंधेरीमध्येही याच प्रकारे कारवाई करण्यात आली. मेट्रो स्टेशनजवळील प्रसादम, भारत, जसलोक मिठाई, नागरदास रोडवरील चायनीज पदार्थाचे दुकान, अंधेरी बेकरी स्टॉल यावर कारवाई करत सात सिलेंडर जप्त करण्यात आले. त्याशिवाय १५ दुकानांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.
याशिवाय ए वॉर्डमधील रस्त्यांवरील काही खाद्यपदार्थाचे ठेले, सी वॉर्डमधील भगत ताराचंद, डी वॉर्डमधील सरदार पावभाजी, एच वॉर्डमधील केएफसी आदी उपाहारगृहांवर कारवाई केली गेली. प्रत्यक्ष मुंबईत लाखो उपाहारगृहे असून त्यांची अवस्था तिथे जाणाऱ्या ग्राहकांनाही परिचित आहे.
मात्र पहिल्या दिवशी कुर्ला तसेच अंधेरीतील काही दुकानांचा अपवाद वगळता शहराच्या इतर भागांत पालिकेला अनधिकृत बांधकामांव्यतिरिक्त कारवाई करण्यासाठी फारसे काही आढळलेले नाही.

‘सिटी किनारा’च्या मालकाला अटक
हॉटेल सिटी किनारा जळीतकांडप्रकरणी हॉटेलचालक शरद त्रिपाठी याला सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. सदर दुर्घटनेत आठ जण मृत्युमुखी पडले होते. अखेर सोमवारी या हॉटेलचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले.