‘मामा काणे’, ‘पणशीकर’, ‘आनंद भुवन’वर बडगा
दसऱ्याच्या विश्रांतीनंतर पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी चौथ्या दिवशी उपाहारगृहांविरुद्ध धडक कारवाई केली. दादरमधील मामा काणे उपाहारगृह, पणशीकर हॉटेल, आनंद भुवनसह तब्बल २०० हून अधिक उपाहारगृहांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ६४हून अधिक गॅस सिलिंडर हस्तगत करण्यात आले.
कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ आगीत सात विद्यार्थ्यांसह आठजण मृत्युमुखी पडल्यानंतर पालिकेने उपाहारगृहांच्या तपासणीचा धडाका लावला आहे. या मोहिमेदरम्यान उपाहारगृहांतील अनधिकृत बांधकामे, पदपथावरील अतिक्रमण, बेकायदा गॅस सिलिंडर तसेच अनुज्ञापन आणि अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राशिवाय उपाहारगृह सुरू करण्याविरुद्ध कारवाई होत आहे. परवानगीविना अंतर्गत बदल करणाऱ्या उपाहार गृहांवरही महापालिकेने नोटीस बजावली आहे. तर काही उपाहारगृहांमधील अतिक्रमणे या कारवाईदरम्यान हटविण्यात आली आहेत.

आयुक्तांची भेट
उपाहारगृह मालकांच्या संघटनेने शुक्रवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांची मुख्यालयात भेट घेतली. मात्र कारवाई थांबविण्याबाबत आयुक्तांनी त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही, असे पालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.