धूळ खात पडलेली वाहने डासांचे अड्डे, नोटिशीनंतरही वाहने न हटवल्यास पालिकेतर्फे लिलाव

मुंबईतील रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्षांनुवर्षे एकाच जागी धूळखात पडून असलेली वाहने जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अशी वाहने हेरून त्यावर नोटीस चिटकवण्यात येणार असून ४८ तासांत ती या जागेवरून न हटवल्यास पालिका ही वाहने ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करणार आहे. अशी ‘पडीक’ वाहने डासांची उत्पत्तीस्थाने बनू लागल्याचे आढळून आल्याने तसेच ही वाहने रहदारीस अडथळा ठरू लागल्याने पालिकेने ही कारवाई आरंभली आहे.

मुंबईतील विविध भागांत रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागांवर वर्षांनुवर्षे अनेक वाहने उभी राहिलेली दिसतात. अनेकदा ही वाहने कुणाची, याबाबत परिसरातील रहिवाशांनाही कल्पना नसते. एकाच ठिकाणी उभी असल्याने धूळ साचून तसेच कचऱ्यामुळे ही वाहने दरुगधीचे अड्डे बनतात. पावसाळय़ात अशा वाहनांमध्ये पाणी साचून ती डासांच्या अळय़ांची उत्पत्तीस्थाने बनतात. त्यामुळे एका प्रकारे ही वाहने शहरातील साथीच्या आजारांनाही कारणीभूत ठरत आहेत. अनेक ठिकाणी ही वाहने रहदारीस अडथळाही ठरू लागली आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेने ही पडीक वाहने हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांवर मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते.

अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नवी कार्यपद्धती तयार केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेल्या वाहनांचे परीरक्षण खात्यातील अभियंत्यांमार्फत नियमितपणे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात आढळणाऱ्या अशा वाहनांवर नोटीस चिकटविण्यात येणार आहे. ४८ तासांमध्ये वाहन मालकाने वाहन उचलून नेले नाही, तर ते ताब्यात घेण्यात येईल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत मालकाने संपर्क न साधल्यास त्या वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे. ही वाहने जप्त करण्यासाठी पालिकेच्या सात परिमंडळांमध्ये टोईंग व्हॅन उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

चालू वर्षांत नोव्हेंबपर्यंत अशा वाहनांवर केलेल्या कारवाईतून पालिकेच्या तिजोरीत तब्बल एकूण १ कोटी ६८ लाख २४ हजार रुपये जमा झाले आहेत.

दहा टोइंग गाडय़ा

पूर्वी अशी वाहने उचलण्यासाठी पालिकेकडे सहा टोइंग व्हॅन होत्या. आता १० टोइंग व्हॅन उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यापैकी सात वाहने पालिकेच्या सात परिमंडळांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. परिमंडळ २, ४ आणि ५ मधील गरज लक्षात घेऊन तेथे अतिरिक्त एक टोईंग व्हॅन उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करणे पालिकेला शक्य होणार आहे.

पालिकेच्या तिजोरीत भर

पालिकेने जप्त केलेल्या तब्बल दोन हजार २३१ वाहनांचा मार्च २०१७ मध्ये लिलाव केला होता. या वाहनांच्या लिलावातून पालिकेला ४१ लाख ३२ हजार रुपये महसूल मिळाला. तसेच ऑगस्टमध्ये दोन हजार ७४७ वाहनांचा लिलाव करण्यात आला आणि पालिकेला ९५ लाख ९६ हजार रुपये महसूल मिळाला. जानेवारी ते आक्टोबर २०१७ या काळात पालिकेने उचललेली दोन हजार २३५ वाहनांपैकी ३४६ वाहने संबंधितांनी दंड भरून सोडवून घेतली. त्यापोटी पालिकेला ३० लाख ९६ हजार रुपये मिळाले. नोव्हेंबर अखेपर्यंत पालिकेच्या तिजोरीत या वाहनांवरील कारवाईद्वारे एकूण १ कोटी ६८ लाख २४ हजार रुपये जमा झाले.

नागरिकांना आवाहन

आपल्या परिसरात अशा प्रकारचे वाहन आढळल्यास नागरिकांनी पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा दूरध्वनी क्रमांक १९१६ वर तक्रार करावी. तसेच अथवा  http://www.mcgm.gov.in अथवा  portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावरही तक्रार करता येईल.