२०१२ पूर्वीच्या इमारतींतील रहिवाशांना दिलासा

‘फंजिबल चटईक्षेत्रफळ’ अस्तित्वात येण्याआधी ज्या रहिवाशांनी सज्जा (बाल्कनी), गच्ची, फुलझाडे लावण्याची जागा (फ्लॉवर बेड) तसेच चटईक्षेत्रफळातून मुक्त असलेली जागा सदनिकेच्या जागेत समाविष्ट केली असेल त्यांना आता ही जागा अधिकृतपणे वापरता येणार आहे. यासाठी गृहनिर्माण संस्था वा विकासकांमार्फत महापालिकेकडे प्रस्ताव पाठवून प्रीमिअम भरून या अतिरिक्त जागेचा लाभ उठविता येणार आहे. मुंबई महापालिकेने अलीकडे जारी केलेल्या या परिपत्रकामुळे हजारो नागरिकांची पालिकेच्या कारवाईतून सुटका झाली आहे.

जानेवारी २०१२ पासून फंजिबल चटईक्षेत्रफळ अस्तित्वात आले. बाल्कनी, सदनिकेची गच्ची, फ्लॉवर बेड आदी पूर्वी चटईक्षेत्रफळातून मुक्त असलेल्या जागा चटईक्षेत्रफळात गणल्या जाऊ लागल्या. पूर्वीच्या इमारतींमध्ये अनेकांनी अशा जागा वापरण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सदनिकेत अनधिकृत बदल केल्याबद्दल पालिकेकडून या रहिवाशांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. या रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार सतत होती. आता मात्र महापालिकेने २१ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून ही बांधकामे अधिकृत करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

बेकायदा इमारती अधिकृत करण्याबाबत सरकारने ७ ऑक्टोबर २०१७ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यासाठी महाराष्ट्र नगररचना कायद्यात सुधारणा करण्यात आली. कुठली अनधिकृत बांधकामे अधिकृत होऊ शकतात, याबाबत त्यात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या अधिसूचनेला अनुसरून मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी केले आहे. जानेवारी २०१२ पूर्वीच्या ज्या इमारतींना निवासयोग्य प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना वा प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पात गृहनिर्माण संस्था किंवा विकासकामार्फत प्रस्ताव देऊन ही बांधकामे अधिकृत करता येतील.

सज्जावापर परवानगीचे सर्वाधिकार आयुक्तांना

सज्जा, गच्ची, फुलझाडे लावण्याची जागा (फ्लॉवर बेड) तसेच चटईक्षेत्रफळातून मुक्त असलेली जागा सदनिकेच्या जागेत समाविष्ट करण्यास मुंबई महापालिकेने रहिवाशांना सशर्त अनुमती दिली असली तरी याबाबतचे सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. अशी अनुमती देताना रहिवाशांना अनेक प्रमाणपत्रे आणि न्यायालयीन खटला उद्भवल्यास महापालिका जबाबदार नसल्याची कबुली देणारे बंधपत्रही द्यावे लागणार आहे.

मात्र अशी बांधकामे अधिकृत करण्याच्या प्रस्तावाबरोबरच इमारतीच्या संरचनात्मक क्षमतेबाबतचे प्रमाणपत्रही रहिवाशांना सादर करावे लागणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी गृहनिर्माण संस्थांचे ना-हरकत प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे. अशी बांधकामे अधिकृत केल्यानंतर भविष्यात काही कारणांमुळे कोणत्याही प्रकारचा न्यायालयीन खटला उद्भवल्यास त्यास महापालिका जबाबदार नसल्याचे बंधपत्रही रहिवाशाला द्यावे लागणार आहे.

फंजिबल चटईक्षेत्रफळ म्हणजे काय?

ही संकल्पना जानेवारी २०१२ मध्ये अस्तित्वात आली. त्याआधी बाल्कनी, गच्ची, फ्लॉवर बेड तसेच वापरात नसलेली जागा आदी चटईक्षेत्रफळाच्या मोजणीतून मुक्त होती. तरीही विकासकांकडून ग्राहकांकडून सुपर बिल्टअपच्या नावाखाली चौरस फुटांमागे पैसे आकारले जात होते. जानेवारी २०१२ नंतर या जागेचा चटईक्षेत्रफळात समावेश करण्यात आला. बाल्कनी, सदनिकेची गच्ची, फ्लॉवर बेड आदी चटईक्षेत्रफळ म्हणून गणले जाऊ लागले. निवासी इमारतीसाठी उपलब्ध चटईक्षेत्रफळाच्या ३५ टक्के तर व्यापारी सदनिकांसाठी २० टक्के फंजिबल चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी शीघ्रगणकाच्या अनुक्रमे ६० व १०० टक्के दराने प्रीमिअम आकारण्याचे धोरण पालिकेने जारी केले.