न्यायालयाने आदेश दिल्यामुळे चार वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेली धोकादायक खासगी इमारत पोलिसांच्या मदतीने बुधवारी पाडण्यात पालिकेला यश आहे. त्यामुळे आता मुंबईमधील धोकादायक खासगी इमारत पाडण्याचा श्रीगणेशा महापालिकेने केला आहे. लवकरच इतरही धोकादायक इमारतींवर पालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता आहे.
अंधेरी येथील मरोळ मरोशी रोडवर १९७१ साली चंद्रा अपार्टमेंट ही तीन मजली इमारत बांधण्यात आली होती. कालांतराने ही इमारत मालकाने विकली आणि तिचे नामकरण युसूफ महल असे झाले.
वेळोवेळी दुरुस्ती न करण्यात आल्याने ही इमारत मोडकळीस आली आणि महापालिकेने २०१० मध्ये ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली. तसेच इमारत रिकामी करण्याचे आदेश रहिवाशांना करण्यात आले. त्यावेळी ३१ पैकी २८ रहिवाशांनी तात्काळ स्थलांतर केले. मात्र, तीन सदनिकांमध्ये राहणारा एक रहिवासी जागा रिकामी करण्यास सातत्याने नकार देत होता. त्यामुळे गेली चार वर्षे पावसाळ्यात या इमारतीवर पालिकेकडून नोटीस बजावण्यात येत होती. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने पोलिसांच्या धोकादायक इमारत तात्काळ पाडण्याचे पालिकेला आदेश दिले.
महापालिकेने बुधवारी पोलिसांच्या मदतीने ही इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली. घर रिकामे करण्यास नकार देणाऱ्या रहिवाशाला पोलिसांच्या मदतीने इमारतीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पालिकेने या इमारतीवर हातोडा चालविला. पालिकेला आपल्या सर्व धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आलेले अपयश आणि रिकाम्या केलेल्या इमारती पाडण्यात होत असलेली दिरंगाई या पाश्र्वभूमीवर या खासगी इमारतीवरील कारवाईला महत्त्वप्राप्त झाले आहे.