पालिकेच्या निविदा प्रक्रियेत आमूलाग्र बदल; निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद

नालेसफाईपाठोपाठ उघडकीस आलेल्या रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेले अपयश लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आपल्या निविदा प्रक्रियेत आमूलाग्र बदल केले आहेत. निश्चित करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाची मार्गदर्शकतत्त्वे आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम विचारात घेऊन नवी निविदा प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. नव्या निविदा प्रक्रियेत दोषदायित्व कालावधी दोनऐवजी पाच वर्षे, काम सुरू करण्यापूर्वीची आणि नंतरची छायाचित्रे, कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदाराला काही काळाकरिता अथवा कायम प्रतिबंध अथवा त्याची अंतर्गत नोंदणी रद्द करणे आदी अटींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

नालेसफाई आणि रस्ते कामांच्या निविदांमध्ये कामात कुचराई झाल्यास कोणती कारवाई करण्यात येणार याचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. त्यामुळे नालेसफाई, रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतर संबंधित कंत्राटदारांविरुद्ध प्रशासनाला तात्काळ कारवाई करणे शक्य झाले नाही. परिणामी, संबंधित कंत्राटदारांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून पुढील कारवाई करण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेतच बदल करण्याचे आदेश दिले होते. या कामासाठी उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल आणि शिफारशी मंगळवारी अजोय मेहता यांच्याकडे सादर केला.

अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध

सुधारित निविदा प्रक्रियेबाबत तांत्रिक समितीने सादर केलेला अहवाल आणि शिफारशी पालिकेच्या www.mcgm.gov.in किंवा portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. यावर संबंधितांनी १ जून २०१६ पर्यंत सूचना आणि निरीक्षणे नोंदवावी. सूचना अथवा निरीक्षणे उपायुक्त (सुधार), सहावा मजला, नवीन विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ या पत्त्यावर अथवा dmc.improvements@mcgm.gov.in या ई-मेलवर पाठवावी.