News Flash

गरीबनगरमधील बहुमजल्यांवर अखेर हातोडा

वांद्रे रेल्वे स्थानकातून येणाऱ्या पुलालगत उभारलेल्या दोन आणि तीन मजली १२ झोपडय़ांवरही हातोडा चालविण्यात आला.

वांद्रे रेल्वे स्थानकातून पूर्वेला जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या बहुमजली झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या.

रहिवाशांच्या ‘रास्ता रोको’मुळे वांद्रे येथील कारवाईत अडथळा

वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडय़ाला खेटून उभ्या असलेल्या गरीबनगरमधील १२ बहुमजली झोपडय़ांसह २५ अनधिकृत बांधकामांवर, तसेच सात स्टॉल्सवर पालिकेने बुधवारी हातोडा चालविला. वांद्रे रेल्वे स्थानकातून पूर्वेला जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या बहुमजली झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे आता या पुलावरून प्रवाशांना निर्भयपणे चालणे शक्य होणार आहे. झोपडय़ांविरुद्ध कारवाई सुरू होताच झोपडपट्टीतील रहिवाशी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे पालिकेला कारवाईतून हात आखडता घ्यावा लागला.

वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा, गरीबनगर आदी परिसरातील झोपडय़ांवर चढविण्यात आलेल्या अनधिकृत मजल्यांमुळे या वस्त्या धोकादायक बनू लागल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’मध्ये ‘झोपडय़ांच्या इमल्यांपुढे पूल थिटा’ या मथळ्याखाली ३ जून, २०१६ रोजी प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या झोपडय़ांचे सर्वेक्षण करून कारवाईचे आदेश दिले होते. पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात बेहरामपाडय़ामध्ये ५०० बहुमजली झोपडय़ा असल्याचे आढळून आल्यानंतर या ठिकाणी तातडीने कारवाई करून पाच झोपडय़ा पाडण्यात आल्या होत्या. परंतु, त्यावेळी रमझान महिना सुरू असल्याने कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

मात्र, बुधवारी पालिकेच्या ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाने गरीबनगरमधील झोपडय़ांवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली.वांद्रे रेल्वे स्थानकातून पूर्वेला जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या बहुमजली झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. यापूर्वी ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाने गरीबनगरमधील स्कायवॉक ६० अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई केली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उभारलेल्या त्यापैकी २५ झोपडय़ा आणि सात स्टॉल या कारवाईदरम्यान तोडण्यात आले. त्याचबरोबर वांद्रे रेल्वे स्थानकातून येणाऱ्या पुलालगत उभारलेल्या दोन आणि तीन मजली १२ झोपडय़ांवरही हातोडा चालविण्यात आला. या बहुमजली झोपडय़ा तोडण्यात आल्यामुळे गुदमरलेला पूल मोकळा झाला आहे. दोन जेसीबी, तीन डम्परच्या सा’ााने ही कारवाई करण्यात आली. ६० पोलीस अधिकारी आणि हवालदार यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये पालिकेचे १० अधिकारी, ४० कामगार यांनी ही कारवाई केली.

रेल्वेकडून असहकार्य

रेल्वेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि रेल्वे पोलिसांनी कारवाईदरम्यान मदत करावी, अशी विनंती दोन दिवसांपूर्वी पालिकेने केली होती. मात्र बुधवारी प्रत्यक्षात कारवाई सुरू होताच रेल्वेकडून पालिकेला कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही. रेल्वेच्या हद्दीमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या सहकार्याशिवाय या झोपडय़ा तोडणे अवघड आहे. त्यामुळे रेल्वेकडे मदत मागण्यात आली होती. परंतु आमच्या हद्दीतील झोपडय़ा आम्ही तोडू असे सांगत रेल्वेकडून सहकार्य करण्यात आले नाही, असे पालिका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लवकरच बेहरामपाडय़ावर हातोडा

बेहरामपाडय़ामध्ये सुमारे ५०० बहुमजली झोपडय़ा असून त्यापैकी बहुसंख्य झोपडय़ांवर पाचहून अधिक मजले चढविण्यात आले आहेत. यापैकी एखादी बहुमजली झोपडी कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच बचावकार्यासाठी तेथपर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन बेहरामपाडय़ातील बहुमजली झोपडय़ांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

रहिवाशांचे ‘रास्ता रोको’

पालिकेने बहुमजली झोपडय़ांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच गरीबनगर आणि बेहरामपाडय़ातील रहिवाशी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. काही रहिवाशी पालिका अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते, तर काही रहिवाशांनी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर सुमारे ३०० जणांचा समुदाय जमा झाला होता. यामुळे या परिसरातील वातावरण तंग बनले होते. अखेर परिस्थिती चिघळू नये म्हणून पालिकेने आपली कारवाई थांबविली. रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांकडे मुदत मागितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:28 am

Web Title: bmc talking action on illegal behrampada
Next Stories
1 भाज्यांचा ‘ऑनलाइन’ बाजार तेजीत!
2 अग्निशमन दलात पहिल्यांदाच ७३६ जागांवर भरती
3 बेदरकार वाहनांचा ‘वेग’ वाढला!
Just Now!
X