रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध
पावसाळ्यामध्ये मुंबईत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने सोडला असून त्याचाच एक भाग म्हणून सोसायटय़ांना अत्यंत अल्प दरात झाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईच्या मातीची वैशिष्टय़े लक्षात घेऊन मुंबईकरांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील मातीत रुजतील, वाढतील आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे आवश्यक आहे. मात्र मातीमध्ये घट्टपणे मूळ धरू न शकणाऱ्या वृक्षांचे रोपण वर्दळीच्या ठिकाणी करणे टाळावे. मुंबईत कोणती झाडे रुजू शकतील याचा अभ्यास करून पालिकेच्या उद्यान विभागाने कोणती झाडे लावावीत कोणती लावू नयेत याची यादी जाहीर केली आहे.
मुंबईमध्ये बहावा, तामण करंज, नागचाफा, सात्वीन, बकुळ, समुद्रफूल, पुत्रंजीव, कडुनिंब, उबर, कदंब, पिंपळ, वावळ, शिशव, हेबडा, कांचन, वटवृक्ष यासारखी झाडे प्राधान्याने लावावीत, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. त्याचबरोबर गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष, जंगली बदाम यासारखी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळावे, असेही परदेशी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc target plantation of one million tree
First published on: 07-06-2016 at 02:56 IST