मुंबई : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळविण्याचा विचार सुरू झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी दिली. मात्र अ‍ॅक्सिस बँकेकडून अग्निशमन दलातील खातेदार अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या ४० लाख रुपयांच्या विम्याच्या सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशी सेवा सरकारी बँकेकडून मिळू शकते का याची चाचपणी करण्यात येत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळविण्याची घोषणा करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला एक धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना हा धक्का असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेत खाती असून ही खाती सरकारी बँकेत वळविण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मात्र या बँकेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना ४० लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्याबाबत गटनेत्यांच्या बैठकीतही चर्चा करावी लागेल. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या.