मुंबई : सागरी किनारा मार्ग या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक सर्व परवानग्या उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या परवानग्या रद्द केल्यामुळे प्रकल्पाचे काम थांबले असून दर दिवशी १० कोटींचे नुकसान पालिकेला सोसावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे वरळीकडील टोक या दरम्यान कोस्टल रोडचे काम सुरू आहे. वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित आणि वरळी मच्छिमार सर्वाेदय सहकारी संस्था यांनी पालिकेला कोर्टात खेचले आहे. यापूर्वीही उच्च न्यायालयाने या प्रकल्पाच्या कामावर स्थगिती आणली होती, मात्र पालिकेने सर्वोच्च न्यायालयात जाऊन ही स्थगिती उठवली होती. आता तर न्यायालयाने परवानग्या रद्द करून नव्याने परवानग्या घेण्याचे आदेश दिले आहेत.