29 October 2020

News Flash

करबुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव?

पालिकेचे २८५ कोटी थकविणाऱ्या २२ जणांची दुसरी यादी जाहीर

( संग्रहीत छायाचित्र )

पालिकेचे २८५ कोटी थकविणाऱ्या २२ जणांची दुसरी यादी जाहीर

प्रसाद रावकर, मुंबई

पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर बुडविणाऱ्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय घेऊन कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. या निर्णयावर विचारमंथन सुरू असतानाच मालमत्ता करापोटी २८५ कोटी थकविणाऱ्या २२ जणांची यादी पालिकेने बुधवारी जाहीर केली.

जकात आणि मालमत्ता कर हे दोन पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत मानले जात होते. मात्र केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी केल्यानंतर जकात कर बंद करण्यात आला. त्यामुळे मोठय़ा उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्याच आठवडय़ात पालिकेने मालमत्ता करापोटी तब्बल ७०५ कोटी ४१ लाख रुपये थकविणाऱ्या १०० जणांची यादी जाहीर केली होती. करनिर्धारण आणि संकलन विभागाने बुधवारी मालमत्ता कर थकविणाऱ्या २२ जणांची यादी जाहीर केली आहे. या २२ जणांनी मालमत्ता करापोटी तब्बल २८५ कोटी ९१ कोटी रुपये थकविले आहेत. थकबाकीदारांमध्ये विकासक, व्यावसायिक इमारतींचे मालक आदींचा समावेश आहे.

या २२ जणांच्या यादीमध्ये परळ येथील रघुवंशी मिलमधील सर्वाधिक थकबाकीदार आहेत. रघुवंशी मिलने मालमत्ता करापोटी ६६ कोटी ९८ लाख रुपये थकविले आहेत. त्याचबरोबर याच भागातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाने ६४ कोटी १५ लाख रुपये, तर गेल्या वर्षी अग्नितांडवामुळे प्रकाशझोतात आलेल्या कमला मिल कम्पाऊंडने ५० कोटी ४० लाख रुपये थकविले आहेत. भांडुप येथील मालमत्तेपोटी एचडीआयएलने  १८ कोटी ५५ लाख रुपये मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा केलेला नाही. या यादीमध्ये कुर्ला येथील कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन (८ कोटी ५२ लाख रुपये) आणि युनिव्हर्सल प्रिमायसेस अ‍ॅण्ड टेक्स्टाईल (७ कोटी ३७ लाख रुपये), अंधेरी परिसरातील दि इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग (६ कोटी २४ लाख रुपये), राजहंस असोसिएट (५ कोटी ९६ लाख रुपये), स्नेहयोगी को-ऑप हौसिंग सोसायटी (५ कोटी १९ लाख रुपये), महेंद्र व्होरा (५ कोटी रुपये), ट्रेड सेंटर वधवा बिल्डर्स (५ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नेपच्यून एन्टरप्रायझेस, वसुंधरा डेव्हलपर्स, कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन, एव्हरेस्ट को-ऑफ हौसिंग सोसायटी, सनसाइन को-ऑप हौसिंग सोसायटी, गजराज को-ऑप हौसिंग सोसायटी निर्माण आदींचाही या यादीत समावेश आहे.

पालिकेने मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. परवानग्या मिळाल्यानंतर गोरेगाव- मुलुंड लिंक मार्ग प्रकल्पाचेही काम करण्यात येणार आहे. मुंबईतील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आदींची मोठय़ा प्रमाणावर कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेला निधीची आवश्यकता आहे. या प्रकल्पांना निधीची चणचण भासू नये म्हणून पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. संबंधितांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मोठय़ा थकबाकीदारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत.

– देवीदास क्षीरसागर, साहाय्यक आयुक्त, करनिर्धारण आणि संकलन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:59 am

Web Title: bmc to auction property of tax defaulter
Next Stories
1 एकत्र निवडणुकीस भाजपचा विरोध
2 मेट्रो-३चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
3 ‘मुख्यमंत्री चषक’चा मुंबईत ‘युवा महासंगम’!
Just Now!
X