News Flash

करबुडव्यांच्या मालमत्तांचा लिलाव

२४ विभागांमधील २४० थकबाकीदारांची यादी तयार

२४ विभागांमधील २४० थकबाकीदारांची यादी तयार

प्रसाद रावकर, मुंबई : वारंवार स्मरण करूनही मुंबईच महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम जमा न करणाऱ्यांच्या संबंधित मालमत्तेवर जप्ती-अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. आता यापैकी तब्बल ५८१ कोटी रुपये थकवणाऱ्या २४० जणांच्या मालमत्तांचा पहिल्या टप्प्यात लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र तूर्तास एखाद महिना थकबाकीची रक्कम भरण्याची संधी या मंडळींना देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र मालमत्तांचा लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे

देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेच्या महसुलाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला. जकात कराची नुकसानभरपाईपोटी दर महिन्याला सरकारकडून पैसे देण्यात येत आहेत. मात्र ही रक्कम पाच वर्षे मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेचा डोलारा कोसळू नये यासाठी पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नोटीस बजावून, तसेच संवाद साधल्यानंतरही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांच्या मालमत्तांवर करनिर्धारण व संकलन विभागाने फेब्रुवारी २०१९ पासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. करबुडव्यांचा पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरही अनेकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे जप्ती आणि अटकावणीची कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईनंतरही काही जणांनी मालमत्ता कराची थकीत रक्कम पालिका तिजोरीत जमा केलेली नाही. त्यामुळे आता पालिकेने त्यांच्या संबंधित मालमत्तांचा लिलाव करण्याच्या कारवाईचे हत्यार उपसले आहे. चालूू आर्थिक वर्षांत डिसेंबर अखेपर्यंत मालमत्ता कर वसुलीचे नियोजित उद्दिष्ट पालिकेला गाठता आलेले नाही. मालमत्ता करवसुलीत साधारण ३४.४४ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याची भूमिका पालिकेने घेतली आहे.

करनिर्धारण व संकलन विभागाने २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील करबुडव्यांची यादी तयार केली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मालमत्ता कराची सर्वाधिक थकबाकी असलेल्या १० मालमत्ताधारकांचा या यादीत समावेश आहे. त्यात बडे विकासक, मोठय़ा कंपन्या, खासगी इमारती आदींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २४० करबुडव्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित मालमत्तांचा लिलाव करण्यापूर्वी मालमत्ताधारकांवर नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच थकबाकीची रक्कम भरण्यासाठी किमान एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. मात्र तरीही करभरणा न केल्यास संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाद्वारे थकीत रक्कम वसूल करुन पालिका तिजोरीत जमा केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

मालमत्ता कर न भरण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र आता कर न भरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी वारंवार नोटीस बजावून, संपर्क साधूनही कर न भरलेल्यांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच अटकावणीची कारवाईही करण्यात आली. डिसेंबर २०१९ पर्यंत ही कारवाई करण्यात आलेल्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. पालिका अधिनियमातील तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.

– संगीता हसनाळे, सहाय्यक आयुक्त, करनिर्धारण व संकलन विभाग

पहिल्या टप्प्यातील वसुली (रुपये कोटींमध्ये)

१३३.१६  शहर

२५५.२८   पश्चिम उपनगर

१९२.६७   पूर्व उपनगर

५८१.११   एकूण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:20 am

Web Title: bmc to auction tax defaulters properties zws 70
Next Stories
1 मुंबई-पुणे मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा १५ जानेवारीपर्यंत रद्द
2 वित्त आणि प्रकल्प समितीच्या मान्यतेनेच ‘रंगवैखरी’चे आयोजन
3 नवीन वर्षांत ३५ पादचारी पुलांच्या कामांचा ‘भार’
Just Now!
X