मुंबई : ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’तर्फे (बीपीटी) शिवडीनजीक च्या समुद्रात १०० हेक्टर क्षेत्रात भराव टाकून उभारण्यात येणाऱ्या ‘सेन्ट्रल पार्क’वर विविध देशांची संस्कृती दर्शवणारी उद्याने तयार करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्राथमिक अवस्थेत असून उद्याने उभारण्यासाठी ‘कें द्रीय परराष्ट्र मंत्रालया’च्या मदतीने बीपीटी प्रशासन विविध देशांना आमंत्रित करणार आहे.

‘पूर्व सागरतट विकास प्रकल्प’अंतर्गत (ईस्टन वॉटरफ्रन्ट) बीपीटी प्रशासन शिवडीच्या समुद्रात १४६ हेक्टर इतका भराव टाकून ‘सेन्ट्रल पार्क’ उभारणार आहे. ‘ईस्टर्न वॉटरफ्रन्ट’ प्रकल्पाचा विकास आराखडा तयार झाला असून प्रशासनाने तो जाहीर केला आहे.

यामध्ये पूर्व किनारपट्टीच्या २८ किमीच्या पट्टय़ामधील ९६६.३० हेक्टर परिसराचा नागरी मनोरंजन, व्यापार आणि व्यावसायिक अंगाने विकास करण्यात येईल. प्रक ल्पांतर्गत शिवडी आणि कॉटनग्रीन येथील १४६ हेक्टर क्षेत्रावर पार्क आणि उद्याने तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

ज्यासाठी जमिनीवरील १२८ एकरचे क्षेत्र वापरण्यात येईल. तर उर्वरित २३३ एकर क्षेत्रासाठी  ‘हे’ बंदर आणि ‘हाजी’ बंदर दरम्यान असणाऱ्या समुद्रात भराव टाकला जाईल. भरावाच्या परवानगीसाठी हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

समुद्रात ९४ हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून तयार करण्यात येणाऱ्या जमिनीवर विविध देशांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी उद्याने तयार करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा प्राथमिक प्रस्ताव बीपीटीने तयार केला आहे. ही उद्याने तयार करण्यासाठी १८ देशांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची

प्रस्ताव प्राथमिक अवस्थेत असून या प्रस्तावाला मूर्त स्वरूप देण्यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी लवकरच मंत्रालयाला पत्र पाठविणार असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे जो देश स्वत:चे उद्यान या भूभागावर तयार करेल. त्या देशाला या उद्यानाचे व्यवस्थापन पाहावे लागेल. रशिया, जर्मनी, फ्रान्स, जपान, सिंगापूर अशा भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांना उद्यान निर्मितीसाठी आमंत्रित करण्याचा विचार आहे.