साडेसात हजार अतिरिक्त शौचकुपे

निधी असूनही जागेअभावी वर्षांनुवर्षे शौचालयांचे प्रस्ताव रखडण्याचा अनुभव असलेल्या महानगरपालिका प्रशासनाने नवीन शक्कल लढवत बहुमजली शौचालयांचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मुंबईत येत्या वर्षांत साडेसात हजारांहून अधिक अतिरिक्त शौचकुपे उपलब्ध होणार आहेत. जुन्या शौचकुपांच्या जागीही नव्याने शौचकूप बांधले जाणार असून एकूण शौचालयांपैकी ५० टक्के शौचालये कुर्ला, चेंबूर, गोवंडी, देवनार या परिसरांत बांधली जातील.

गेल्या २० वर्षांत बांधण्यात आलेली बहुतांश शौचालये ही एकमजली आहेत. नवीन शौचालये बांधण्यासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी निधी मंजूर केला जातो. मात्र कोणालाही आपल्या शेजारी शौचालये नको असल्याने हा निधी पडून राहतो. लोकसंख्येच्या गरजेनुसार उपलब्ध शौचालयांची संख्या किमान दुपटीने वाढवण्याची गरज आहे. ही निकड लक्षात घेऊन महानगरपालिकेने आवश्यकतेनुसार बहुमजली शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकमजली ते तीनमजली शौचालयांचा समावेश असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी आणि लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे. या शौचालयांमध्ये अपंग व्यक्तींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावरच व्यवस्था असेल.

महापालिकेची जुनी, धोकादायक परिस्थितीत असणारी शौचालये तोडून त्या ठिकाणी नव्याने बहुमजली शौचालये बांधण्यात येणार आहे. ११ हजार १७० जुन्या शौचकुपांच्याच जागेत १५ हजार ७७४ नव्या शौचकुपांचे बांधकाम करण्यात येईल. त्यामुळे जुन्या शौचालयांच्या जागेत ४ हजार ६०४ अतिरिक्त शौचकुपे उपलब्ध होतील. याचसोबत ३ हजार ४४ शौचकुपे ही पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार आहेत. या प्रकारे पुढील वर्षभरात १८ हजार ८१८ शौचकुपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. वस्ती स्वच्छता कार्यक्रमाचे उपप्रमुख अभियंत्याकडून याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ९ महिने ते १२ महिने कालावधी अपेक्षित आहे. कामाचे आदेश १५ जानेवारीपर्यंत देण्याच्या सूचना आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्या आहेत. यासाठी ३७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.एकूण १८ हजार ८१८ शौचालयांपैकी गोवंडी, देवनार, मानखुर्द या भागांत ७२०० शौचकुप उपलब्ध होतील. कुल्र्यामध्ये २३२८ शौचकुप बांधले जातील. वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व या परिसरांत १३०२, अंधेरी ते मालाडमध्ये २३९८, कांदिवली ते दहिसरमध्ये १६१९ आणि परेल, वडाळा, दादर, माहीम परिसरांत १८७२ शौचकुप बांधण्यात येतील.