महापालिकेला गेल्या अनेक वर्षांत तुंबलेला वांद्रयाचा चमडावाडी नाला साफ करण्यासाठी अखेर अतिक्रमणांवर हातोडा मारावा लागला.
नालेसफाई हे एकमेव काम असल्याप्रमाणे प्रशासनाची संपूर्ण ताकद नालेसफाईच्या कामाला लावली आहे. सोमवारी पोलीस बंदोबस्तात चमडावाडी नाल्याच्या काठावरच्या २७ झोपडय़ा पालिकेने पाडल्या. मात्र, या कामात धार्मिक स्थळे आडवी आल्याने पालिकेला ही कारवाई थांबवावी लागली. खरेतर या नाल्याच्या काठावर ५०० हून अधिक झोपडय़ा असून बेहरामपाडय़ात तर झोपडय़ांची उंची सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र अनेक निवासी कारणाबरोबरच छोटे-मोठय़ा व्यवसायासाठी बळकावले गेलेले इथले क्षेत्र अतिक्रमण कारवाईमुक्त राहिले आहे.
शहरातील बहुतेक मोठे नाले साफ होत असले तरी दोन्ही काठांनी दुमजली झोपडय़ा उभ्या राहिलेल्या धारावीच्या चमडावाडी नाल्यात क्रेन उतरण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ माणसे उतरवून त्यामुळे नाल्यातील प्रचंड गाळ काढणे अशक्य होते. या नाल्यामुळे संपूर्ण धारावी व मध्य मुंबईचा परिसर दरवर्षी पाण्याखाली जातो. मात्र तरीही चमडावाडी नाल्याच्या पात्रावर कचऱ्याच्या ढिगाप्रमाणे वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांना तरीही हात लावला जात नव्हता. वर्षांनुवर्षे साठून कडक झालेला गाळ आणि दोन्ही बाजूने सातत्याने पडत असलेला कचरा यामुळे दरवर्षी तुंबणाऱ्या या नाल्याच्या सफाईबाबत ‘लोकसत्ता’ने प्रथम वाचा फोडली. नालेसफाईची पाहणी करण्यासाठी फिरणाऱ्या राजकीय प्रतिनिधींकडूनही या नाल्याबद्दल तक्रारी सुरू झाल्यावर सफाईला बाधा आणणाऱ्या झोपडय़ा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी एच पूर्व विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात झोपडय़ा तोडण्यास सुरुवात केली. या कारवाईत २७ झोपडय़ा तोडण्यात आल्या. मात्र धार्मिक स्थळावरून वातावरण तापू लागल्याने पालिकेने कारवाई आटोपती घेतली.
प्रत्यक्षात या नाल्यावर दोन्ही बाजूंनी झोपडय़ा आहेत. ही अतिक्रमणे हटवून नाल्याची सफाई होणे आवश्यक आहे. पाऊस तोंडावर आला असताना अनेक नाल्यांमधील गाळ तसाच आहे. त्याचा फटका येत्या पावसाळ्यात बसेल, असे सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव म्हणाल्या.