महाराष्ट्रातील अनेक गावे हागणदारीमुक्त झाली असतानाच देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरवणाऱ्या मुंबईत आजही अनेक ठिकाणी रस्त्यावर प्रात:विधी उरकले जातात. त्यामुळे पालिकेने मुंबईमधील शौचकुपांची संख्या १ लाख ३६ हजारांपर्यंत वाढविण्याचा संकल्प सोडला असून त्यांपैकी १३०० शौचकूप येत्या २०१६ पर्यंत बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

महाराष्ट्रातील अनेक गावे हागणदारीमुक्त झाल्याबद्दल सरकारने संबंधितांना अलीकडेच गौरविले. या गावांनी देशापुढे एक आदर्श ठेवला आहे. पण ३३ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेला मात्र अद्याप हे जमलेले नाही. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी केवळ बी आणि सी विभाग वगळता अन्य विभागांतील झोपडपट्टय़ा आणि रेल्वे मार्गालगत रस्त्यांवरच प्रात:विधी उरकण्यात येत असल्याचे पालिकेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पालिकेने मुंबईमधील सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमधील ६० टक्के जनता झोपडपट्टीच्या आश्रयाला आहे. पण मुंबईमध्ये केवळ ७९,५४२ शौचकूप आहेत. त्यांची संख्या वाढवून ती १ लाख ३६ हजार करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.