मुंबई : पालिकेत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या सुरक्षारक्षकांवरच सध्या पालिका प्रशासनाची करडी नजर आहे. एखादा सुरक्षारक्षक मोबाइलवर व्यस्त असल्याचे दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जात आहे. इतकेच नाही तर काही सुरक्षारक्षकांना दोन ते पाच हजारांपर्यंत दंडही लावण्यात आला आहे. सुरक्षारक्षकांच्या पगारात अशा मनमानी पद्धतीने कपात केल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला आहे.

पालिकेच्या सुरक्षारक्षकांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून विविध कारणांवरून नाराजी पसरलेली आहे. सुरक्षारक्षकांच्या वाट्टेल तशा बदल्या केल्यामुळे मुख्यालयात नवीन तरुण सुरक्षारक्षकांना नेमण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेत येणारे नगरसेवक, पत्रकार, अधिकारी यांच्यात आणि सुरक्षारक्षकांमध्ये खटके उडत असतात. त्यातच आता प्रशासनाने मुख्यालयातील, वॉर्ड कार्यालयातील सुरक्षारक्षकांना मोबाइलबंदी केली आहे. यापुढे जाऊन प्रशासनाने आता सुरक्षारक्षकांना मेमो काढण्यास सुरुवात केली आहे. कामावर असताना मोबाइलमध्ये बघत होता, हेडफोन कानात लावले होते, डोळे मिटले होते अशा कारणांवरून मेमो काढले जात आहेत. तर महिन्याच्या पगारातून दोन ते पाच हजारांपर्यंत दंड वसूल केला जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सुरक्षारक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

संघटना न्यायालयात जाणार

मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ज्या सुरक्षारक्षकांच्या पगारातून दंडाची रक्कम कापण्यात आली आहे, त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई मनमानी स्वरूपाची असल्याची प्रतिक्रिया सुरक्षारक्षकांनी दिली आहे.

 

कामगारांच्या विरोधात केलेली ही कारवाई एकतर्फी आहे. सुरक्षारक्षकांना शिस्त लागली पाहिजे, पण कामगारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी प्रशासनाने दिली पाहिजे. दंडाची रक्कम कापल्याने काहींना  निम्मा पगार आला आहे.

-अ‍ॅड. प्रकाश देवदास, अध्यक्ष मुंबई पालिका कार्यालयीन कर्मचारी संघटना