भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय; आजपासून मोहिमेस सुरुवात

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिकेन तातडीने शहरातील खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलामार्फत सोमवारपासून मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या तपासणी सुरू करण्यात येत आहे. त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयांवर नोटीस बजावण्यात येणार आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये १० बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांतील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व लहान-मोठय़ा खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश अग्निशमन दलाला दिले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये सोमवारपासून तपासणी सुरू होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम, शीव रुग्णालयांमध्ये नियमितपणे अग्निसुरक्षा तपासणी केली जाते. त्याचा अहवाल वेळोवेळी सादर केला जातो. मात्र पुन्हा एकदा पालिका रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या तपासणीची उजळणी करण्यात येईल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्यास तात्काळ व्यवस्थापनावर नोटीस बजावण्यात येणार आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी व्यवस्थापनाला काही दिवसांची मुदत देण्यात येईल. मुदतीत त्रुटी दूर न केल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेने शहरातील पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेवर लक्ष केंद्रित केले आहे. पालिका रुग्णालयांची तपासणी नियमित करण्यात येते. त्यांची पुन्हा एकदा उजळणी केली जाईल. त्याचबरोबर सोमवारपासून खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी मोहीम हाती घेण्यात येईल. अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्यास ती दूर करण्याची सूचना संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला करण्यात येईल.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त