यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठणा-या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. याद्वारे  प्रसारमाध्यमांतून दाखवल्या जाणा-या अवास्तव बातम्यांना आळा घालता येईल, असा पालिकेचा दावा आहे.
महानगरपालिका परिसर, हिंदमाता चौक, मराठा मंदिर, नाना चौक, सखुबाई मोहिते मार्ग, गावडे चौक, परळ टीटी उड्डान पूल, शिवडी रेल्वे स्थानकाजवळील शिवडी चौक मार्ग, सायन बस डेपो जवळील मुख्याध्यापक भवन, या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पूर्व उपनगरातील कुर्ला शेड य़ा ठिकाणी एक कॅमेरा बसवण्यात येणार आहे. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि क्रांती नगर येथील पुलावर दोन कॅमेरे बसवून मिठी नदीच्या पाण्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
“आज पर्यंत आम्ही टिव्हीवरील बातम्यांनुसार आमच्या यंत्रणेला व कामगारांना पाणी साठलेल्या ठिकाणी पाठवत होतो. मात्र, काही वेळा टीव्हीवर दाखवले जाणारे चित्रण हे जुने असते, त्यामुळे यावर्षीपासून आम्ही स्वत:च कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, असे महानगर पालिका उपायुक्त व वादळी पाऊस निचरा विभागाचे अभियंता एल. एस. व्हाटकर म्हणाले.   
त्याचबरोबर वेगवेगळ्या स्थानकांवरील वाहतूक पोलिसांच्या ८० कॅमे-यांच्या चित्रीकरणाचा देखील वापर करण्यात येणार आहे. या सर्वच भागांत पाणी साठत नाही.  मात्र, त्यातून इतर पाणी साठणा-या भागांवर लक्ष ठेवता येईल, असे व्हाटकर म्हणाले.
२३ जून ते २० सप्टेंबर पर्यंत १७ दिवसांच्या कालावधीत मोठ्या लाटां उसळण्याची शक्यता आहे. २५ जूनला ५ मिटर पर्यंतच्या सर्वात उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  महानगरपालिका सदर तारखा मुंबई विद्यापीठ व व्यावसायीक संस्थांना कळवणार आहे.