मार्चअखेर १४८ झोपडय़ा हटवणार

गेली अनेक वर्षे झोपडय़ांच्या मगरमिठीत अडकलेला जुहू येथील इर्ला नाला अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम पालिकेने युद्धपातळीवर हाती घेतली आहे. ही अतिक्रमणे हटविल्यानंतर जुहू आणि आसपासच्या परिसरातील सखलभाग आणि वस्त्यांना पावसाळ्यात जलमुक्ती मिळू शकणार आहे. इर्ला काठच्या तब्बल १४८ झोपडय़ा मार्चअखेपर्यंत हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करून नाल्याच्या प्रवाहाचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे.

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

जुहू आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर इर्ला नाल्यातून पाण्याचा निचरा होतो. काही छोटे नाले इर्ला नाल्याला येऊन मिळतात आणि इर्ला नाला दुथडी भरून वाहू लागतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इर्ला नाल्याच्या काठावर मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा उभ्या राहिल्या असून नाल्याच्या प्रवाहात त्या अडथळा बनू लागल्या आहेत. पावसाळ्यात या अतिक्रमणामुळे नाल्याच्या आसपासच्या वस्त्या आणि सखलभाग जलमय होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत इर्ला नाल्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र झोपडय़ांच्या अतिक्रमणांमुळे नाल्याच्या रुंदीकरणाला खो बसला होता. पालिकेने युद्धपातळीवर ही अतिक्रमणे हटवून नाल्याचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला असून नाल्याकाठी उभ्या असलेल्या शास्त्रीनगर आणि संतोषनगरमधील तब्बल १४८ झोपडय़ा हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या झोपडीधारकांवर पालिकेने नोटीस बजावली आहे. या वस्त्यांमध्ये पात्र-अपात्रतेची तपासणी पूर्ण झाली असून सुमारे १०० झोपडय़ा पात्र, तर ४४ झोपडय़ा अपात्र ठरल्या आहेत. पात्र झोपडीधारकांना पर्यायी घर देण्यात आल्यानंतर नाल्याकाठच्या या सर्व झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. मार्च महिन्याच्या अखेपर्यंत इर्ला नाल्याचा काठ अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने सोडला असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्चअखेपर्यंत इर्ला नाला अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे.

जुहू येथील गीतानगर परिसरातून वाहणारा अभिषेक नाला इर्ला नाल्याला येऊन मिळतो. या नाल्याच्या काठावर तब्बल ११५ झोपडय़ा उभ्या होत्या. ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने अभिषेक नाल्याकाठच्या झोपडय़ांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केले. आश्चर्याची बाब म्हणजे गेली अनेक वर्षे उभ्या असलेल्या या झोपडपट्टीत एकही झोपडी पात्र होऊ शकली नाही. पात्र-अपात्रतेची पडताळणी केल्यानंतर ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन विभागाने या झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. त्यामुळे अभिषेक नाल्याच्या आसपासच्या सखल भागांना पावसाळ्यात जलमुक्ती मिळेल, अशी आशा पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

इर्ला नाल्याच्या रुंदीकरणामध्ये काठावर उभ्या असलेल्या १४८ झोपडय़ा अडसर बनल्या आहेत. नाल्याचे रुंदीकरण झाल्यानंतर पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठी वाट मिळेल आणि आसपासचा सखलभाग जलमय होण्याचे संकट टळेल.

प्रशांत गायकवाड,, साहाय्यक आयक्त, ‘के-प.’ विभाग कार्यालय