उपचारांच्या दरांचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक होणार; पुढील बैठकीत ठराव

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उपचारांसाठी भरमसाट रक्कम घेऊन रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप बसविण्याची तयारी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांच्या दर्शनी भागात वैद्यकीय शुल्काचे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याचा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांचा आरोग्य परवाना रद्द करण्याचा ठराव पालिका सभागृहात करण्यात येणार आहे.

सरकारी तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रुग्णांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे काही रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे पसंत करतात. मात्र ही बाब खासगी रुग्णालयांच्या पथ्यावर पडत आहे. खासगी रुग्णालयांत करण्यात येणारी तपासणी आणि उपचारांसाठी किती शुल्क आकारण्यात यावे याबाबत पालिकेने नियम केले आहेत. मात्र या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

करोनाची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी पालिका रुग्णालये वा पालिकेने व्यवस्था केलेल्या करोना केंद्रांमध्ये उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. मात्र या रुग्णांकडून अवाच्या सवा पैसे घेण्यात आले. रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या अशा काही खासगी रुग्णालयांवर पालिकेने कारवाई केली होती.

काही रुग्णालयांवर कारवाई केल्यानंतरही रुग्णांच्या लुटीचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता नगरसेवकांनी मनमानी कारभार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी आकारण्यात येणारे दर नमूद केलेला फलक खासगी रुग्णालयांच्या दर्शनी भागात बसविणे बंधनकारक करण्याबाबतची ठरावाची सूचना सभागृहात मांडण्याचा निर्णय नगरसेवक हरीश छेडा यांनी घेतला आहे. पालिका सभागृहाच्या पुढील बैठकीत ही ठरावाची सूचना पटलावर मांडण्यात येणार आहे. पालिका सभागृहाने एकमताने ही ठरावाची सूचना मंजूर केल्यानंतर ती पुढील कारवाईसाठी पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाने या ठरावाच्या सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय उपचारांवरील दर आधीच कळू शकतील, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.