रेल्वेमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतील निर्णय

एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकाबाहेरील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची दुरुस्ती आणि काही ठिकाणी नव्याने पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. या पादचारी पुलांसाठी रस्त्यावर जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. या बदल्यात रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्यांच्या (कल्व्हर्ट) रुंदीकरणासाठी परवानगी देण्याची तयारी रेल्वेमंत्र्यांनी दर्शविली आहे. परिणामी, रेल्वे मार्गावरून जाणारे जीर्ण पादचारी पूल आणि खालून जाणाऱ्या नाल्यांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.

परळ – एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर गेल्या शुक्रवारी चेंगराचेंगरी होऊन २३ जणांचा बळी गेला. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीस पालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, एमएमआरडीएचे यू.पी.एस. मदान उपस्थित होते. परळ – एल्फिन्स्टन रोड स्थानकांदरम्यानच्या पादचारी पुलावरील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने काही उपाययोजनांचा ऊहापोह या बैठकीत करण्यात आला.

रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणच्या पादचारी पुलांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तर काही ठिकाणी पादचारी पूल नव्याने बांधण्याची गरज आहे. पादचारी पूल रस्त्यावर ज्या ठिकाणी उतरतो, तेथे मोकळी जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर संभाव्य ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यावरील जागा मार्गिकेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू झाला आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांच्या मार्गिका फेरीवाल्यांच्या गराडय़ात अडकल्या आहेत. या फेरीवाल्यांना हटवून रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांच्या मार्गिका मोकळ्या करण्याची जबाबदारीही पालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच रेल्वे स्थानक अथवा रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पादचारी पुलाजवळील रस्त्यावरील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

नाल्यांचेही रुंदीकरण

पालिकेने ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील नदी आणि नाल्यांच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे बहुतांश काम पूर्ण केले आहे. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण होऊ शकलेले नाही. परिणामी, या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असून त्यामुळे आसपासच्या परिसरात पाणी साचते. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्यांच्या रुंदीकरणाला तात्काळ परवानगी देण्याची तयारी रेल्वेमंत्र्यांनी दर्शविली. परवानगी मिळाल्यानंतर या नाल्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. ही कामे रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात येणार असून त्यासाठी लागणारे पैसे पालिकेकडून देण्यात येणार आहेत.

रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पादचारी पुलांसाठी रस्त्यावरची जागा उपलब्ध करण्याची, तसेच तेथील फेरीवाल्यांना हटविण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. त्यादृष्टीने लवकरच कारवाई सुरू करण्यात येईल. तसेच रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्यांच्या रुंदीकरणालाही लवकरच रेल्वेकडून परवानगी देण्यात येणार आहे. रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम रेल्वेच करणार आहे. त्यामुळे रेल्वेला नाले रुंदीकरणासाठी पैसे देण्यात येतील.

– अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त