महापालिकेचा पुढाकार; रुग्णांना मानसिक आधार देण्यावर भर

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोना झालेल्या रुग्णांशी नातेवाईकांचा संपर्क करून देण्यासाठी पालिकेने आता पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. ज्या रुग्णांकडे मोबाइल किंवा स्मार्टफोन नाहीत, त्यांना टॅबद्वारे नातेवाईकांशी संपर्क करून बोलणे करून देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. रुग्णाला औषधांबरोबरच मानसिक आधार देण्यासाठी पालिका हा प्रयोग करणार आहे.

करोना या आजारात रुग्ण अनेकदा हतबल होतात. बाधित रुग्णाला तीव्र लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल केल्यानंतर बरे व्हायला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. मध्यम लक्षणे असली तरी किमान दहा दिवस रुग्णालयात मुक्काम असतो. या काळात आजूबाजूला पीपीई किट घातलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांव्यतिरिक्त कोणीही दिसत नाही. नातेवाईकांशी संपर्क पूर्ण तुटतो. त्यामुळे रुग्ण एकटा पडतो आणि शरीराबरोबरच मनानेही खचतो. त्यातही ज्या रुग्णांकडे स्वत:चे मोबाइल नाहीत किंवा ज्यांना मोबाइल वापरता येत नाहीत, अशा रुग्णांना अधिकच एकटेपणा येतो. त्यामुळे पालिकेने आता या रुग्णाचा नातेवाईकांशी संवाद व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

सध्या केईएम, नायरमध्ये परिचारिका किंवा वॉर्डबॉय हे आपल्या फोनवरून एखाद्या रुग्णाचे नातेवाईकांशी बोलणे करून देतात. पण ज्यांच्याकडे मोबाइल नाही, त्यांच्यासाठी ही सोय देण्यासाठी प्रत्येक वॉर्डला एक टॅब देण्याचा विचार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टॅबमध्ये रुग्णांची सर्व माहितीही संकलित करता येईल व संभाषण करण्यासाठीही त्याचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

महालक्ष्मी येथे राहणारे दत्तात्रय गुरव हे ६४ वर्षांचे गृहस्थ १५ ते २६ जून असे अकरा दिवस करोनावरील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल होते. आपले अनुभव सांगताना ते म्हणतात, अन्य आजारांमध्ये नातेवाईक रुग्णाला येऊन भेटतात, विचारपूस करतात, खायला आणतात. पण करोना वॉर्डात कोणालाही जाण्याची परवानगी दिली जात नाही. काही नातेवाईक आपल्या रुग्णासाठी डबा किंवा खाण्याचे पदार्थ वगैरे घेऊन येतात आणि प्रवेशद्वारावर ठेवून निघून जातात. गुरव पुढे सांगतात की, माझ्याकडे माझा फोन होता त्यामुळे मी घरच्यांशी फोनवर बोलायचो. पण ज्यांच्याकडे फोन नसायचा त्यांना संपर्क साधता येत नव्हता, असे दिसून आले.

ज्यांना प्रवासाची मुभा दिली आहे, त्यांनीच प्रवास करावा. ज्यांना प्रवासाची मुभा नाही, अशांनी अवैधरित्या प्रवास टाळावा. याशिवाय बनावट ओळखपत्र किं वा पास तयार करुन प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

– शिवाजी सुतार ,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मृत्यूचे प्रमाण खूप वाढले होते त्या काळात आम्ही मृत्यूची कारणीमीमांसा केली. तेव्हा जे अनेक मुद्दे पुढे आले, त्यात नातेवाईकांशी संवाद हा मुद्दाही आमच्या लक्षात आला. त्यामुळेच टॅबद्वारे नातेवाईकांशी दृक्श्राव्य माध्यमातून बोलणे करून देण्याचा विचार करत आहोत.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त