महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आलेल्या संजय मुखर्जी यांनी त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल १ कोटी ४४ हजार रुपयांचा खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे. मात्र हा बंगला मोडकळीस आला असल्याने मुखर्जी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच बंगल्याच्या नूतनीकरणासाठी परवानगी मिळाली होती, असे सूत्रांनी सांगितले.
महानगरपालिकेत आलेले उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या राहत्या जागेच्या नूतनीकरणासाठी लाखोंचा खर्च करतात. अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी व पल्लवी दराडे यांनी त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी केलेल्या खर्चाची माहिती अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून विचारली होती. जल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पालिका आयुक्तांच्या परवानगीने डॉ. संजय मुखर्जी यांना जानेवारी २०१५ मध्ये गेस्ट हाऊस देण्यात आले संजय मुखर्जी यांच्या निकटवर्तीयांनी मात्र ही माहिती चुकीच्या गृहीतकांवर आधारलेली असल्याचे सांगितले. मुखर्जी राहत असलेला बंगला मोडकळीस आला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी २०१५ पूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचप्रमाणे जल विभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्याचे नूतनीकरण जे अर्थसंकल्पातूनच करण्यात येते, असे या सूत्रांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे या त्यांचे पती व मुख्यमंत्री कर्यालयातील सचिव प्रवीण दराडे यांच्यासह ४८३० चौरस फुटांच्या बंगल्यात राहतात. मात्र बंगल्याच्या नूतनीकरणासाठी झालेला खर्च हा त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित असल्याने त्याबाबत माहिती देण्यास आक्षेप घेण्यात आला आहे.

पाणी शुल्क आकारणी नाही
२६८२ चौ. फूट क्षेत्रफळाच्या या जागेवर जानेवारी २०१५ पासून १ कोटी ४४ हजार ६७९ रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर वर्ष २०१५-१६ मध्ये ९२ हजार २३४ रुपये वीज खर्च झाला आहे. त्याआधी २०११ ते २०१४ या चार वर्षांत या बंगल्यावर ८९ हजार ७०५ रुपये खर्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे या बंगल्यास पाणी शुल्क आकारले जात नाही. जल विभागातील खर्चातून मुखर्जी यांच्या बंगल्याचा खर्च भागविण्यात आल्याबद्दल गलगली यांनी आक्षेप व्यक्त केला.