डांबरी रस्त्यांवर ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’ करण्याचा निर्णय

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी हॉटमिक्स, कोल्डमिक्स, डांबर वा खडीमिश्रित मिश्रण आणि पेव्हर ब्लॉक हे सगळे पर्याय अयशस्वी ठरल्यानंतर आता पालिकेने डांबरी रस्त्यांवर ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’चा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. ४० फुटांपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावर्षी पालिका प्रशासनाने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या सुधारणेवर अधिक भर दिला आहे. खड्डय़ांवरील अनेक प्रयोग फसल्यानंतर आता तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यापूर्वीही अनेकदा पालिकेने हे तंत्रज्ञान आणण्याचे ठरवले होते. मात्र आता यंदाच्या अर्थसंकल्पात १६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते १० वर्षे टिकतात व त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे मुंबईतील डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे ९० किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले. मात्र सिमेंट काँक्रीटला लागणारा खर्च आणि वेळ पाहता हा वेग कमी आहे. तर मुंबईतील मोठे रस्ते वगळले तर ४५ टक्के रस्ते हे ६० फुटांच्या आतीलच आहेत. त्यामुळे या छोटय़ा रस्त्यांवर यंत्रसामग्री जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी नवे तंत्रज्ञान वापरता येणार असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

या मार्गावर प्रयोग यशस्वी

मुलंड पश्चिमेकडील विठ्ठल भाई पटेल रोड, गणेश गावडे रोड, ताजमहाल हॉटेलच्या मागे असलेला मांडलिक पथ या रस्त्यांवर व्हाइट टॉपिंगचा प्रयोग करण्यात आला आहे.

दीड हजार खड्डे बुजवले

पालिकेने गेल्यावर्षी खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा ही मोहीम राबवली होती. खड्डय़ांच्या अ‍ॅपद्वारे गेल्यावर्षी पालिकेने १६३० तक्रारी आल्या. त्यात १४७२ खड्डे २४ तासांत बुजवले, तर उर्वरित खड्डेही मुदतीनंतर बुजवले.

व्हाइट टॉिपंग तंत्रज्ञान काय आहे?

या तंत्रज्ञानात डांबरी रस्त्यावर १०० ते २०० मिमी जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर चढवतात. याकरिता पूर्ण सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यापेक्षा कमी खर्च येतो. ज्या रस्त्यांवर गाडय़ांचे प्रमाण कमी आहे अशा रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असून त्यामुळे रस्ते २४ ते ३६ तासांत वापरासाठी खुले होतात. कमी खर्च असलेल्या या तंत्रज्ञानामुळे रस्ते २० वर्षे आपला दर्जा टिकवून ठेवतात, अशी माहिती सल्लागार समितीचे सदस्य पी. एल. बोंगिरवार यांनी दिली.

खड्डय़ांसाठी आतापर्यंत केलेले प्रयोग

मुंबईकरांना गुळगुळीत रस्ते देण्यासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करीत असते. मात्र तरीही पावसाळ्यात खड्डे पडतातच. खड्डय़ांवरून पालिकेला आतापर्यंत अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. हॉटमिक्स, डांबर वा खडीमिश्रित मिश्रण आणि पेव्हर ब्लॉक हे पारंपरिक प्रयोग फसल्यानंतर पालिकेने त्यापैकी ऑस्ट्रियातून आयात केलेल्या ‘मिडास’ या कोल्डमिक्स मिश्रणाचा प्रयोग केला. भर पावसातही खड्डे बुजवणारे हे तंत्रज्ञान आणले खरे, मात्र १७० किलो दराचे हे मिश्रण पालिकेला परवडणारे नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पालिकेने हे मिश्रण वरळीच्या प्लाण्टमध्ये तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हा पालिकेला फक्त २२ रुपये किलो इतका खर्च आला. मात्र हे मिश्रणसुद्धा खड्डे बुजवण्यासाठी अपयशी ठरले. काही दिवसांनी खड्डय़ातून माती बाहेर येऊ लागली. आता संपूर्ण डांबरी रस्त्यावरच व्हाइट टॉपिंगचा थर लावण्यात येणार आहे.

’ महापालिका परीक्षित करत असलेले रस्ते- २०५५ किमी

’ २०१८-१९ मध्ये १३४ किमी रस्त्यांची सुधारणा करण्यात आली

’ त्यात २० किमी चे सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आहेत.

’ २०१९-२० मध्ये डिसेंबपर्यंत १६२ किमी रस्त्यांची सुधारणा केली त्यात ६५ किमीचे सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आहेत.

’ २०२०-२१ मध्ये २८९ किमी रस्त्यांची सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहेत. त्यात २६६ किमी सिमेंट-काँक्रीट करण्याचा विचार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चारपट सिमेंट-काँक्रीट करण्यात येणार आहे.

’ डांबरी रस्त्यांचा हमी कालावधी कालावधी ५ वर्षे

’ सिमेंट काँक्रीटसाठी १० वर्षे

’ २०२०-२१ मध्ये रस्ते सुधारणेसाठी १६०० कोटींची तरतूद केली आहे.