आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह स्थायी समितीलाही छायाचित्रण पाहता येणार

मुंबई : नदी-नाल्यांमधील उपसलेला गाळ वाहून नेणाऱ्या आणि पुन्हा मुंबईत परतणाऱ्या वाहनांचे वजन करण्यासाठी जकात नाक्यांवरील वजनकाटय़ांचा वापर करण्यात येणार असून या वजनकाटय़ांवर  जाता-येता होणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या वजन प्रक्रियेवर सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पालिका मुख्यालयामधूनच करडी नजर ठेवता येणार आहे. केवळ पालिका अधिकाऱ्यांनाच नव्हे तर स्थायी समिती सभागृहातूनही वजनकाटय़ांवरील कारभारावर लक्ष ठेवता येणार आहे. त्यासाठी सध्या जकात नाक्यांवरील वजनकाटय़ांवर आवश्यक ती संगणक प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

पावसाळा जवळ येत असल्यामुळे मुंबईतील लहान-मोठे नाले आणि नद्यांमधील गाळ उपसण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. मात्र वजनकाटय़ांची संख्या कमी असल्यामुळे अनेक गाळवाहू वाहने मुंबईतच खोळंबत असल्याचे निदर्शनास आले आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर जकात नाके बंद करण्यात आले. सुन्यासुन्या झालेल्या जकात नाक्यांवरील वजनकाटेही बंद करण्यात आले. मात्र नदी-नाल्यातील गाळ वाहून नेणाऱ्या आणि कचराभूमीत गाळ टाकून मुंबईत परतणाऱ्या वाहनांचे वजन करण्यासाठी जकात नाक्यांवरील वजनकाटे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. दहिसर, मुलुंड एलबीएस मार्ग, पूर्व द्रूतगती महामार्ग आणि वाशी येथील जकात नाक्यांवरील प्रत्येकी दोन असे एकूण आठ वजनकाटय़ांवर गाळवाहन नेणाऱ्या वाहनांचे वजन करण्यासाठी लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या नालेसफाईचा घोटाळा उघडकीस आला होता. एकाच वेळी एका वाहनातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून गाळ वाहून नेण्यात येत असल्याच्या नोंदी आढळून आल्या होत्या. तसेच गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकीचे क्रमांकही आढळून आले होते. नालेसफाई घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने जकात नाक्यांवरील वजनकाटय़ांवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे सीसी टीव्ही कॅमेरे बसवून गाळ वाहून नेणाऱ्या आणि कचराभूमीत गाळ टाकून मुंबईत परतणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाहनावर ‘व्हेईकल ट्रेकिंग’ यंत्रणाही बसविण्यात आली आहे.जकात नाक्यांवरील वजनकाटय़ाच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून या सीसी टीव्ही कॅमेरामध्ये बंदिस्त होणाऱ्या छायाचित्रणाचे थेट पालिका मुख्यालयात दर्शन घडणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचे कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेराची जोडणीचे टीव्ही बसविण्याचा  प्रशासनाचा मानस आहे.

मुंबईतून गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनाचे जकात नाक्यावरील वजनकाटय़ावर वजन करण्यात येणार आहे. तसेच गाळ टाकून परतणाऱ्या वाहनाचे पुन्हा त्याच वजनकाटय़ावर वजन करण्यात येणार आहे. वजनकाटय़ावर होणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून त्याचे चित्रीकरण पालिका मुख्यालयातून पाहता येणार आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणणे शक्य होईल.

– विद्याधर खंडकर, प्रमुख अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या