जेली फिश आणि पाखटांच्या हल्ल्याची शक्यता असताना ३३ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई महापालिकेला विसर्जनस्थळी पुरेशा रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात अपयश आले आहे. मुंबईतील ४७ विसर्जनस्थळी ६० रुग्णवाहिकांची आवश्यकता असताना केवळ ४४ रुग्णवाहिका उपलब्ध करून पालिकेने आपला दुबळेपणा आणि उदासीन कारभार दाखवून दिला.
गेल्या वर्षी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर हल्लाबोल करून विसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या भाविकांना लक्ष्य बनविणारे पाखट आणि जेली फिशचा यंदाही वावर असल्याचे मत्स्य व्यवसाय (सागरी) विभागाने २८ ऑगस्ट रोजी पालिकेला कळविले होते. त्यामुळे तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विसर्जनस्थळी उपाययोजना करण्यात आली. पाखटांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या आणि जेली फिशच्या दंशामुळे बेजार होणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी महापालिकेने समुद्रकिनाऱ्यांवरील विसर्जनस्थळ, तसेच कोणताही अपघात घडल्यास तात्काळ मदत करता यावी यासाठी अन्य ठिकाणच्या विसर्जनस्थळी ६० रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र महापालिकेला केवळ ४४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या.
त्यामुळे गिरगाव चौपाटी येथे चारऐवजी तीन, वर्सोवा व्हिलेज, सागर कुटीर वर्सोवा, बिर्ला गेट- जुहू आणि जुहू समुद्रकिनारा येथे सहाऐवजी केवळ चार रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. अन्य काही तलावांवरही आवश्यकतेपेक्षे कमी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. गिरगाव आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी मोठय़ा संख्येने भाविक येतात. त्यामुळे या चौपाटय़ांवर पालिकेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पाखटांनी हल्ला चढविल्यास भाविकांना तातडीने रुग्णवाहिनीतून रुग्णालयात नेण्याची गरज भासू शकते. त्यामुळे गिरगाव आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर अधिक रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या रुग्णवाहिका पुरवणारी पालिका भाविकांची काळजी घेण्यात नापास झाली आहे.