पालिका प्रशासनाच्या निर्णयाला चालकांचा विरोध

मुंबई महापालिकेतील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने त्यांच्या घराजवळील पालिकेच्या यानगृहातच उभी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे इंधन बचत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे असले तरी याला वाहनांच्या चालकांनी तीव्र विरोध केला आहे. यानगृहातील असुविधा, वाहनांची स्वच्छता, दुरुस्ती, बदली वाहनाची व्यवस्था, पर्यायी वाहनचालकाची व्यवस्था असे प्रश्न यामुळे निर्माण होतील, असे चालकांचे म्हणणे आहे. मात्र प्रशासन त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई महापालिकेकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकारी अशा एकूण १३० जणांना वाहने उपलब्ध केली जातात. त्यामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, वैधानिक, विशेष आणि प्रभाग समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख आदींचा त्यात समावेश आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना उपलब्ध करण्यात आलेली वाहने संबंधित व्यक्ती घरी गेल्यानंतर पालिकेच्या सातरस्ता येथील रुग्णवाहिका यानगृह अथवा अस्फाल्ट यानगृहात उभी करण्यात येतात. त्यानंतरच वाहनचालक आपल्या घरी निघून जातात. सकाळी पुन्हा यानगृहातून गाडी घेऊन ते संबंधित राजकारणी अथवा अधिकाऱ्याच्या घरी पोहोचतात. मात्र आता राजकारणी व्यक्ती अथवा अधिकाऱ्याला घरी सोडल्यानंतर जवळच्या पालिकेच्या यानगृहात ही वाहने उभी करण्याचा तुघलकी निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात आली. रुग्णवाहिका यानगृहात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या तब्बल ६४ गाडय़ा उभ्या करण्यात येत होत्या. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला घरी सोडल्यानंतर ६४ पैकी २७ गाडय़ा मुंबईतील पालिकेच्या ठिकठिकाणच्या यानगृहांमध्ये धाडण्यात आल्या असून त्यापैकी आठ गाडय़ा देवनार कत्तलखाना मांसवाहिनी गॅरेज, पाच गाडय़ा मुलुंड यानगृह आणि अन्य गाडय़ा पंतनगर कचरा वाहनगृहात उभ्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत अस्फाल्ट यानगृहात उभ्या करण्यात येणाऱ्या २२ गाडय़ा अन्य ठिकाणच्या यानगृहांत उभ्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचे सारथ्य करणाऱ्या चालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

अतिमहत्त्वाच्या वाहनांबरोबरच कचरावाहू वाहने, रुग्णवाहिका, शववाहिनी, मांसवाहिनी, फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणारी वाहने, पाणी खात्याची वाहने अशी विविध प्रकारची वाहने पालिकेच्या ताफ्यात आहेत. ही सर्व वाहने मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या पालिकेच्या २४ यानगृहांमध्ये उभी केली जातात. मात्र सातरस्ता येथील रुग्णवाहिका यानगृह आणि अस्फाल्ट या दोन यानगृहांमध्येच वाहनांची सफाई, दुरुस्ती, सुटे भाग आदी सुविधा उपलब्ध आहेत. या दोन्ही यानगृहांमध्ये तब्बल ३० ते ४० कर्मचारी रात्रीच्या पाळीमध्ये वाहनांची देखभाल करण्यासाठी नियुक्त आहेत. वाहन आल्यानंतर त्याची पूर्ण तपासणी तेथे केली जाते. छोटय़ा-मोठय़ा दुरुस्तीची कामेही रात्रीच पार पाडली जाते. तसेच एखाद्या वाहनामध्ये मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास दुसऱ्या दिवशी अन्य वाहन उपलब्ध करण्यात येते. तसेच प्रकृतिअस्वस्थ्यामुळे अथवा अन्य काही कारणामुळे वाहनचालकाने अचानक रजा घेतली तर त्याच्याऐवजी दुसऱ्या वाहनचालकाला वाहनासोबत पाठविण्याची सोयही या दोन यानगृहांमध्येच आहे. त्यामुळे आता अन्य यानगृहात वाहनांची स्वच्छता, दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न चालकांनी विचारला आहे. या संदर्भात संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांबाबत २००१ मध्ये असाच तुघलकी निर्णय प्रशासनाने घेतला होता. तो अपयशी ठरला. आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांबाबत तसा निर्णय घेण्यात आला आहे.

वामन कविस्कर, म्युनिसिपल मजदूर युनियन