News Flash

शिवसेनेत ‘तुही यत्ता कंची’चा वाद

पक्षाने उमेदवारी दिलेल्यांपैकी नऊ जण बारावीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेले आहेत.

( संग्रहीत छायाचित्र )

विशेष, प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीवर पक्षातूनच नाराजी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला शहरातील विशेष आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उच्चशिक्षित उमेदवार मिळालेला नाही. पक्षाने उमेदवारी दिलेल्यांपैकी नऊ जण बारावीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेले आहेत. यात सातवी, नववीपर्यंत शिक्षण झालेल्यांचाही समावेश आहे. यावरून जनमानसातून प्रतिक्रिया उमटण्यापूर्वीच याचे पडसाद शिवसेनेतूनच उमटू लागले असून पक्षात ‘सुशिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित’ असा वाद रंगू लागला आहे.

एकीकडे पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे सातवी, नववी, दहावी अशी शैक्षणिक आर्हता असलेल्यांच्या गळ्यात समित्यांच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात येत आहे. यावरून पक्षात नाराजीचे वातावरण आहे.

मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक पार पडल्यानंतर वैधानिक, विशेष आणि प्रभाग समिती अध्यक्षपद मिळेल अशी ज्येष्ठ नगरसेवकांना अपेक्षा होती. परंतु ‘मातोश्री’ने पहिल्यांदाच निवडून आलेल्या काही जणांच्या हाती समित्यांच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक खवळले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वैधानिक, विशेष आणि प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे पुन्हा अनेकांचे डोळे ‘मातोश्री’कडे लागले होते.

स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे शिवसेनेने सुटकेचा नि:श्वास सोडला. जुन्या-जाणत्या नगरसेवकांची वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याने ज्येष्ठ नगरसेवकांनीही ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतली होती. आता महिला व बालकल्याण, आरोग्य, विधि, बाजार आणि उद्यान, स्थापत्य (शहरे) आणि स्थापत्य (उपनगरे) या सहा विशेष समित्यांसोबत प्रभाग

समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, यासाठी कमी शैक्षणिक आर्हता असलेल्यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे नगरसेवकांच्या संतापात भर पडली आहे.

विशेष समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार

 • महिला व बाल कल्याण समिती – स्मिता गावकर – दहावी
 • बाजार व उद्यान समिती – हाजी हलीम खान – बारावी
 • आरोग्य समिती – डॉ. अर्चना भालेराव – बीडीएस
 • विधि समिती – अ‍ॅड. संतोष खरात – एलएलबी
 • स्थापत्य (शहर) समिती – अरुंधती दुधवडकर – नववी
 • स्थापत्य (उपनगरे) समिती – साधना माने – एमए डीएड

प्रभाग समिती अध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार

 • एफ-दक्षिण/एफ उत्तर – सचिन पडवळ – दहावी
 • जी-दक्षिण – किशोरी पेडणेकर – पदवीधर
 • जी – उत्तर – मरिअम्मल मुत्तू तेवर – नववी
 • एच-पूर्व/एच-पश्चिम – सदानंद परब – बारावी
 • आर-मध्य/आर-उत्तर – रिद्धी खुरसुंगे – बारावी
 • एम-पूर्व – निधी शिंदे – बारावी
 • एल – किरण लांडगे – बारावी, एलएलबी द्वितीय वर्ष
 • एन – रुपाली आवळे – सातवी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 4:52 am

Web Title: bmc ward committee election bmc shiv sena
Next Stories
1 सागरी किनारा रस्त्यास विलंब
2 बेस्टच्या ४११ वाहनांसाठी वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नाही
3 खड्डेमुक्त रस्ते दिले तरच शहरे ‘स्मार्ट’!
Just Now!
X