मुंबईत करोनाबाधितांचा आकडा वाढू लागताच पुन्हा एकदा बेडची उपलब्धता हा प्रश्न मुंबईकरांना सतावू लागला आहे. पालिकेकडून सरकारी तसेच खासगी अशी दोन्ही रुग्णालयांमधील बेड करोनासाठी ताब्यात घेतले आहेत. मात्र, तरीदेखील रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा अनेक प्रकरणांमुळे मुंबईत बेडचा तुडवडा निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र, त्यावर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईत बेडची कोणतीही कमतरता नसून फक्त नागरिकांनी बेड मिळवताना प्रोटोकॉल पाळला तर बेड मिळणार नाही असं होणार नाही, असं आयुक्त म्हणाले आहेत. त्यासाठी पालिकेनं तयार केलेल्या वॉर्डस्तरीय टीमच्या माध्यमातूनच प्रयत्न करण्याचं आवाहन इक्बालसिंह चहल यांनी केलं आहे.

 

अशी आहे बेड देण्याची व्यवस्था!

पालिका आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत १० हजार १०० करोनाबाधित सापडले आहेत. मात्र, त्यापैकी ८ हजार ७०० रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. हे रुग्ण त्यांच्या घरीच होम आयसोलेशनमध्ये राहतात. उरलेल्या १३०० बाधितांना लक्षणं दिसत आहेत. त्यातूनही साधारणपणे निम्म्या लोकांकडून हॉस्पिटलमध्ये बेडची मागणी केली जाते. उरलेले लोक होम आयसोलेशनमध्येच राहणं पसंत करत आहेत. त्यामुळे ६०० ते ७०० रुग्णांसाठीच बेड उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यासोबतच रोज बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांचे बेड रिकामे होत असतात. त्यानुसार ही व्यवस्था काम करत आहे.

 

कुणालाही बेड हवा असल्यास…

मात्र, बेड हवा असल्यास कुणीही प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊ नये, असं आयुक्तांनी सांगितलं आहे. “मुंबई हे देशातलं एकमेव शहर आहे जिथे खासगी, सार्वजनिक अशा सर्वच ठिकाणच्या करोनासाठीच्या बेडचं नियोजन पालिकेकडून केलं जात आहे. त्यातही पालिकेनं २४ वॉर्डनुसार तयार केलेल्या वॉर्डस्तरीय टीम्सच्या माध्यमातूनच बेडचं नियोजन केलं जात आहे. त्यामुळे कुणालाही बेड हवा असल्यास आपापल्या वॉर्डमधल्या वॉररूम टीमशीच संपर्क साधायला हवा. त्यानंतर बेड मिळणार नाही असं होणार नाही”, असं आयुक्त म्हणाले आहेत.

मुंबईत आकडा वाढतोय, पण घाबरू नका!

दरम्यान, मुंबईत करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असला, तरी त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आयुक्त म्हणाले आहेत. “हात जोडून विनंती करतो की मुंबईत करोनाची स्थिती आटोक्यात आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही. १० फेब्रुवारीला मुंबईत दुसरी लाट सुरू झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत १ लाख ६० हजार नवे करोनाबाधित सापडले. त्यातले १ लाख ३३ हजारांना लक्षणं नव्हते. २७ हजार लोकांनाच लक्षणं होते. त्यापैकीही फक्त निम्मे लोकं हॉस्पिटलमध्ये गेले. आजही आपल्याकडे १७ हजारहून जास्त बेड रिक्त आहेत”, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.