05 March 2021

News Flash

प्रभाग फेररचना भाजपच्या पथ्यावर

पालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपचे ३१ उमेदवार विजयी होऊन पालिकेत दाखल झाले.

गिरगाव, परळ, लालबागसह उपनगरांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता

तुलनेत संख्येने कमी, पण पालिकेच्या प्रत्येक निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या आगामी निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधात शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. प्रभागांच्या फेररचनेत मतदारांचे झालेले विभाजन, मराठीबरोबरच अमराठी मतदारांची वाढलेली संख्या, उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची सुरू असलेली भाऊगर्दी असे अनेक घटक भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. भाजपचे ३१ नगरसेवक निवडणुकीची गणिते जुळवत असले तरी २२७ प्रभागांमध्ये नेते मंडळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालिकेतील सध्याचा संख्याबळाने मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपचे ३१ उमेदवार विजयी होऊन पालिकेत दाखल झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशातील राजकीय समीकरण बदलून गेले आहे. त्यावेळी प्रत्येकाच्या मुखी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नाव होते. गेल्या काही काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून भाजपची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र असे असले तरी मुंबई भाजपने पालिका निवडणुकीत ‘ एकला चलो’चा आग्रह वरिष्ठांकडे धरला आहे. भाजपने त्यादृष्टीने शिवसेनेच्या वाटेत काटे पेरायला सुरुवात सुरुवातही केली आहे.

दहिसर ते कांदिवली या पट्टय़ात शिवसेनेच्या स्थानिक मातब्बर नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. परंतु स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत कलह आणि या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर वाढलेली गुजराती, जैन मंडळींची संख्या आता शिवसेनेच्या वर्चस्वाला खिंडार पाडण्याच्या बेतात आहे. या पट्टय़ात मराठी मतदारांची संख्या अधिक असलेले काही प्रभाग

आहेत. मात्र फेररचनेत हा मराठी टक्का अन्य प्रभागांमध्ये विसर्जीत झाला आहे. त्यामुळे अमराठी मतदारांमध्ये मराठी मतदार हरवून गेले आहेत. पूर्व उपनगरांमध्येही काही प्रभागांतील चित्र असेच आहे. याचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे.

संघ कार्यकर्ते सक्रिय

मुंबईमध्ये शिवसेनेच्या तुलनेत भाजपच्या कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत हीच स्वयंसेवकांची फौज सक्रिय झाली होती. त्याचा परिणाम गोरेगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार सुभाष देसाई यांच्या पराभवाच्या निमित्ताने पाहायला मिळाला होता. अशाच पद्धतीने पालिका निवडणुकीतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कार्यरत झाले आहेत. भाजपचा जोर नसलेल्या प्रभागांमध्ये चांगला उमेदवार देण्यासाठी त्यांची शोधमोहीम सुरू आहे. त्यातच फेररचनेत प्रभागांमधील मतदारांचाही अभ्यास सुरू आहे. आरक्षणाच्या सोडतीतही प्रभाग गेल्यामुळे अनेक नगरसेवकांना आसपासच्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना नवा प्रभाग, नव्या मतदारांना सामोरे जात निवडणुकीची गणिते आखावी लागणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:11 am

Web Title: bmc ward rejig may give bjp edge
Next Stories
1 दारू विक्रेत्यांना यंदाचा चातुर्मास अतिकडक
2 आयुक्तांविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक
3 मुंबई आणि उपनगरांत वाहनांच्या  संख्येत २९ टक्क्यांनी वाढ !
Just Now!
X