साकीनाक्यातील आग दुर्घटनेनंतर पालिका धोरण आखणार; आयुक्तांच्या दालनात आज बैठक

साकीनाका येथील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांना प्राण गमवावे लागल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये सुरू असलेले अनधिकृत भटारखाने, रस्त्यांवर शिजवण्यात येणारे अन्नपदार्थ, हॉटेलच्या मागील चिंचोळय़ा जागेत उभारण्यात येणारे स्वयंपाकगृह, झोपडपट्टय़ांमध्ये सुरू असणारे खाद्यपदार्थाचे कारखाने यांवर प्रतिबंध घालण्याची तयारी महापालिकेने चालवली आहे. या संदर्भात नवीन धोरण आखण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या दृष्टीने पालिकेचा इमारत आणि प्रस्ताव, अतिक्रमण निर्मूलन, दुकान आणि कारखाना परवाना या विभागांसह अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बुधवारी आयोजित केली आहे.

साकीनाका येथील फरसाण तयार करणाऱ्या कारखान्यात झालेल्या अग्नितांडवानंतर पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टय़ा अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. झोपडपट्टीत बहुमजली झोपडय़ा उभ्या राहात आहेत. झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृतपणे अन्नपदार्थ शिजविण्याचा व्यवसाय सुरू आहे. काही जणांनी नियम धाब्यावर बसवून आणि अग्निसुरक्षा खुंटीवर टांगून झोपडपट्टय़ांमध्येच मोठमोठे भटारखाने सुरू केले असून या भटारखान्यांमध्ये सतत धगधगणाऱ्या चुलींमुळे झोपडपट्टय़ा लाक्षागृह बनल्या आहेत. मोठय़ा हॉटेलमध्ये मिळणारे चमचमीत पदार्थ येथे बनवून त्याचा मुंबईच्या विविध भागांत पुरवठा करण्यात येत आहे. पालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता हा व्यवसाय सुरू आहे. या भटारखान्यांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचा पत्ता नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. झोपडपट्टय़ांमध्ये परवानगी न घेताच बेकऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज मोठय़ा संख्येने पाव आणि तत्सम पदार्थ तयार करून ते विक्रीसाठी अन्यत्र पाठविण्यात येतात. एकूणच या व्यवसायांमुळे झोपडपट्टय़ा धोकादायक बनल्या आहेत.

अग्निसुरक्षा खुंटीवर टांगून, पालिकेची परवानगी न घेता ठिकठिकाणी अन्नपदार्थ शिजविणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेण्याच्या विचारात पालिका आहे. या कारवाईपूर्वी मुंबईमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाबरोबरच रस्ता, झोपडपट्टी, चिंचोळ्या गल्ल्या आदी विविध ठिकाणी अनधिकृतपणे अन्नपदार्थ शिजविण्यावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी पालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव, अतिक्रमण निर्मूलन, दुकान आणि कारखाना परवाना या विभागांसह अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बुधवारी बोलावली आहे. या संदर्भात बैठकीत नवे धोरण आखण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

चार मृतदेह रुग्णालयातच

साकीनाक्यातील खैरानी रोड परिसरातील आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १२ कामगारांपैकी एकाची ओळख पटविण्यात अद्याप यश आलेले नाही. तसेच अन्य तीन मृतांचे नातेवाईक मुंबईत दाखल न झाल्याने त्यांचे मृतदेह अद्याप राजावाडी रुग्णालयातील शवागृहातच आहेत.

मृतदेह शंभर टक्के जळाल्याने अनेकांची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी लागला होता, तर अनेकांचे नातेवाईकदेखील जवळपास नसल्याने अनेकांची ओळख पटवण्यात सायंकाळ झाली होती. त्यानंतर सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यावर रात्री उशिरा एकूण आठ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, तर उर्वरित चार मृतदेहांपैकी अद्यापही एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तर तीन मृतदेहांचे नातेवाईक अद्यापही मुंबईत दाखल झालेले नाहीत. त्यामुळे हे सर्व मृतदेह रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, फरसाण कारखान्याचा चालक रमेश भानुशाली याला मंगळवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.