मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दरवर्षीच्या नियोजित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे चार लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

वृक्षलागवड करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. ६५ भूखंडांवर झाडे लावण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.  मियावाकी पद्धतीने सुमारे ३ लाख ९४ हजार झाडे  ८४ भूखंडांवर लावण्यात येणार आहेत.

या वर्षी पालिकेने ४ लाखांपेक्षा अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ३४ हजार ४०० झाडे लावण्यात आली आहेत, तर या वर्षांअखेपर्यंत आणखी ३ लाख ९४ हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे.

विकासकामांसाठी मोठय़ा प्रमाणावर झाडे तोडावी लागतात, तर काही झाडे पावसाळ्यात उन्मळून पडतात. त्यामुळे दरवर्षी पालिकेतर्फे मोठय़ा संख्येने झाडे लावली जातात. गेल्या वर्षी पालिकेने ९७२१ झाडे लावली.

पालिकेतर्फे लावण्यात आलेल्या ३४ हजार ४०० झाडांपैकी १४ हजार झाडे पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये व मैदानांलगत लावण्यात आली आहेत. तर १५ हजार झाडे  वैतरणा धरण क्षेत्रालगत लावली आहेत.

मुंबईतील हिरवाई वाढवण्यासाठी महापालिकेने आपल्या ‘विकास नियोजन आराखडा’ व ‘विकास नियंत्रक नियमावली’मध्ये  महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार  इमारतीच्या प्रस्तावांमध्ये संबंधित जागेवरील मनोरंजन मैदान/ क्रीडा मैदानाच्या निर्धारित जागेपैकी निम्म्या जागेवर मियावाकी पद्धतीने वन विकसित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वन विकसित न केल्यास संबंधित इमारतीला रहिवास दाखला (ओ.सी.) देण्यात येणार नाही.

मियावाकी पद्धतीने लागवड : पालिकेने मुंबईत १०० ठिकाणी मियावाकी जपानी पद्धतीने झाडांची लागवड करण्याचे ठरवले आहे. या पद्धतीत अत्यंत जवळजवळ झाडे लावली जातात.  १९ भूखंडांवर ‘मियावाकी’ पद्धतीने झाडे लावण्याचे काम विभाग किंवा खाते स्तरावर करण्यात येणार आहे, तर १ लाख २६ हजार ४२ चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या ६५ भूखंडांवर झाडे लावण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर हे काम करण्यात येणार आहे.