News Flash

मुंबईकरांवर नवा करभार

निवडणुकांमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये रोखून ठेवलेल्या काही नव्या करांची अंमलबजावणी आगामी वर्षांमध्ये करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

| February 3, 2015 03:11 am

मुंबईकरांवर नवा करभार

निवडणुकांमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये रोखून ठेवलेल्या काही नव्या करांची अंमलबजावणी आगामी वर्षांमध्ये करण्याचा महापालिकेचा मानस आहे. आधीच मालमत्ता कर आणि बेस्ट भाडेवाढीमुळे कंबरडे मोडलेल्या मुंबईकरांवर स्वच्छता, अग्निशमन शुल्क, मलनिस्सारणासह अन्य काही नवीन कर लादण्याची तयारी पालिका प्रशासन करीत असून, त्याची येत्या बुधवारी आगामी अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांवर पडणाऱ्या या नव्या करभारामुळे ‘अच्छे दिन..’ची शक्यता जवळपास मावळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका २०१२ मध्ये पार पडल्यानंतर २०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये मुंबईकरांवर नवी करवाढ लादण्यास सत्ताधारी शिवसेना-भाजपच नव्हे तर विरोधी पक्षही राजी नव्हते. परिणामी या तीन वर्षांमध्ये मुंबईकरांना नव्या कराची झळ बसली नाही. मात्र आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या असून राज्यात भाजप-शिवसेनेचे, तर पालिकेत शिवसेना-भाजप सत्तेवर आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये लागू होऊ न शकलेले नवे कर यंदा मुंबईकरांवर लादण्याची चिन्हे आहेत. मुंबईकरांकडून अग्निशमन शुल्क वसूल करण्याचा पालिकेच्या गेल्या दोन वर्षांपासून इरादा आहे. त्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे सादरही करण्यात आला आहे. ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियाना’अंतर्गत केंद्राकडून पालिकेला अनुदान मिळाले आहे. हे अनुदान देताना केंद्र सरकारने काही अटी पालिकेवर लादल्या आहेत. या अटीनुसार पालिकेला स्वच्छता कर लागू करावा लागणार आहे. हा कर २०१५-१६च्या अर्थसंकल्पामध्ये लागू होण्याची शक्यता आहे. यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मलनि:स्सारण कर मुंबईकरांकडून वसूल करण्याचा पालिकेचा विचार आहे. दरवर्षी पाणीपट्टीमध्ये आठ टक्के वाढ करण्याची तरतूद यापूर्वीच प्रशासनाने अर्थसंकल्पात मंजूर करून घेतली आहे. नजीकच्या काळात निवडणुका नसल्यामुळे पाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हे नवे कर लागणार
* अग्निशमन शुल्क वसूल करण्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे सादर
*‘नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियाना’अंतर्गत केंद्राच्या अटीनुसार स्वच्छता कर   
*यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मलनि:स्सारण कराची शिफारस
*मंजूर तरतुदीनुसार पाणीपट्टीत आठ टक्के वाढ अपेक्षित
प्रसाद रावकर, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 3:11 am

Web Title: bmc will present budget on wednesday
टॅग : Bmc
Next Stories
1 किनारी मार्गावरून मेट्रोही धावणार?
2 नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मराठवाडय़ाचे पाणी रोखले!
3 तडफदार वक्ते, कसदार भाषणे!
Just Now!
X