मुंबई महानगरपालिका तरुण उद्योजकांसाठी ‘स्टार्ट अप हब’ सुरु करणार आहे. नाविण्यपूर्ण कल्पना घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करु पाहणाऱ्यांसाठी हे ‘स्टार्ट अप हब’ उभारले जाणार आहे. अंधेरीत उभारल्या जाणाऱ्या या हबच्या माध्यमातून शहर नियोजनाच्या समस्यादेखील सोडवण्यात येणार आहेत.

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘स्टार्ट अप हब’ची उभारणी होणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली. पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या या हबमध्ये नगर नियोजनाशी संबंधित प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल. ‘पालिकेशी संबंधित समस्या सोडवण्याचे काम स्टार्ट अप/इनोव्हेशन हबमध्ये करण्यात येईल. यामुळे शहरामध्ये रोजगारनिर्मितीदेखील होईल. नव्या कल्पनांचा विचार करणाऱ्या आणि उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरुणांना यामुळे संधी मिळेल,’ असे आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तरुणांसाठी सुरु केल्या जाणाऱ्या स्टार्ट अप हबसाठी पालिका ‘इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची (आयआयटी) मदत घेणार आहे. या हबसाठी पालिकेकडून जागा आणि मुलभूत सुविधा पुरवल्या जातील. तर या ठिकाणी येणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ‘आयआयटी’मधील तज्ज्ञांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.