स्वपक्षीय नेत्यांकडूनच होत असलेल्या अन्यायाविरोधात महानगरपालिकेत दाद मिळत नसल्याचे पाहून नगरसेविकांनी हा अन्याय आता फेसबुकच्या व्यासपीठावर आणला आहे.
स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतरही ‘सावित्रीच्या लेकीं’चा लढा सुरू असल्याचे सांगत माजी महापौर व शिवसेनेच्या नगरसेविका शुभा राऊळ यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. फेसबुककरांनीही त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला आहे.
गेला आठवडाभर महापालिकेतील गटनेते, महापौर यांच्या दालनात आणि त्यानंतर सभागृहातही नगरसेविकांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा चर्चिला गेला. मात्र त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शुभा राऊळ यांनी शुक्रवारी दुपारी लोकसंपर्काचे माध्यम म्हणून फेसबुकचा पर्याय निवडला.
‘सावित्रीच्या लेकीं’चा लढा चालूच आहे.. २१ व्या शतकातही.. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढय़ात ह्या द्रौपदीचे मानहानीरूपी वस्त्रहरण सुरू आहे.. या ध्रुतराष्ट्रांच्या नगरीत द्रौपदीच्या हाकेला धावून येणारा कृष्ण कोणी होईल का.. असे भावनिक आवाहन करीत राऊळ यांनी मन मोकळे केले आहे.
या लढय़ात कृष्णाची वाट न पाहता स्वत:च सर्वशक्तीनिधी लढा द्यायला हवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत अनेक नेटकरांनी माजी महापौरांना पाठिंबा दिला आहे.