पाणी पुरवठा, बेस्ट, रिक्षा यांसह विविध कर्मचारी यांनी आजपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. कामगार नेते शरद राव यांनी आज (सोमवार) ही घोषणा केली. आपल्या मागण्यांबाबत सरकारच्या हस्तक्षेपानंतर हा संप मागे घेण्यात आल्याचंही राव यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईकरांना वेठीला धरणारा कामगार नेते शरद राव यांनी पुकारलेला तीन दिवसांचा संप आज (सोमवार) मध्यरात्रीपासून सुरू होणार होता. मात्र,  आपण सरकारसमोर मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मकरित्या विचार करण्याचे सरकारचे आश्वासन आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा संप मागे घेण्यात आल्याचे राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले.
या आंदोलनात पाणी-पुरवठा विभाग, साफसफाई विभागातील कर्मचारी, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच बेस्टचे कर्मचारी सामील असल्याने या संपाचा मोठा फटका मुंबईकरांना बसणार होता. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणतीही चर्चा न करणाऱ्या राव यांनी त्यांना फक्त निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनीही चर्चेसाठी वेळ देऊन, तसेच संप करून नागरिकांना वेठीस धरू नये, अशी विनंती करूनही राव यांचा आंदोलनाचा निर्णय कायम ठेवला होता. मात्र, आज त्यांनी हा संप मागे घेतल्याचे जाहिर केले.